जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची हुशारी पडताळण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत ६० सहस्र शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार !

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा निर्णय

संभाजीनगर – मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याचे नेहमी म्हटले जाते. २ आठवड्यांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना हतनूर गावातील शाळेत याचा अनुभव आल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेच्या १० सहस्र  शाळांतील विद्यार्थ्यांसमवेत ६० सहस्र शिक्षकांचीही गुणवत्ता परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘प्रथम’ या संस्थेचे साहाय्य घेतले जाणार आहे. (महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील शिक्षक विद्यार्थ्यांना उचित आणि योग्य प्रकारचे शिक्षण देत नसल्याने शिक्षकांचीही परीक्षा घेण्याची वेळ सरकारवर आली आहे, हे दुर्दैवी आणि आश्चर्यकारक आहे. – संपादक)

७ वर्षांनंतर होणारा हा ‘गुणवत्ता सुधार प्रकल्प’ जानेवारी २०२३ मध्ये होईल. एप्रिल २०२३ मध्ये परीक्षा होणार आहे. लातूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी ऑगस्ट मासात लातूर येथे मूल्यांकन केले होते. त्याच धर्तीवर इयत्ता ८ वीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक यांची ज्ञानचाचणी होईल. केंद्रेकर यांनी ७ डिसेंबर या दिवशी मराठवाड्यातील ८ जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

विभागीय आयुक्तांनी या उपक्रमाचे दायित्व गोयल यांच्यावर दिले आहे. गोयल म्हणाले की, लातूर येथे ऑगस्टमध्ये झालेल्या पडताळणीत ४५ टक्के शाळांतील विद्यार्थ्यांना साधा भागाकारही करता येत नव्हता. आम्ही त्यांच्यात सुधारणा करत आहोत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील खासगी संस्थांचे साहाय्य आणि मार्गदर्शन घेतले जात आहे. मूल्यांकनासाठी विविध ‘ॲप’ सिद्ध केले जातील. मूल्यांकनाचा आढावा जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेता येईल. मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचाही प्रयत्न करू.

संपादकीय भूमिका

जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता न पहाताच शिक्षकांची भरती केली जाण्याचा आरोप केला जातो. त्यामुळे शाळेत गुणवत्ता असलेल्या शिक्षकांची भरती अल्प होते. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आणि शिक्षणाचा दर्जा खालावतो.