नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय !

नागपूर – विविध साथीचे रोग आणि वाढत्या रुग्णांचे प्रमाण यांमुळे सध्या चिकित्सालयांत पुष्कळ गर्दी होत आहे, तसेच येथील शासकीय रुग्णालयांवरील भार सातत्याने वाढत आहे; मात्र रुग्णालयांत कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस अल्प होत आहे. या विरोधाभासी स्थितीमुळे तोकडे मनुष्यबळ ही गंभीर समस्या ठरत आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यामुळे रुग्णांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

१. रुग्णांची संख्या वाढल्याने खाटा अल्प पडू लागल्या आहेत. यामुळे मेयो रुग्णालय येथे २५० आणि मेडिकल रुग्णालय येथे ५०० अशा एकूण ७५० खाटांची वाढ करण्यात आली; मात्र ५ वर्षे उलटूनही वाढीव खाटांना मान्यता मिळू शकली नाही.

२. बेडच्या जुन्याच आकड्यांच्या आधारेच मनुष्यबळ संमत आहे. त्यातही निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांच्या जागेवर नवीन भरतीही केली जात नाही. निवासी आधुनिक वैद्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

३. वर्ष २०१७ मध्ये मेयोमध्ये सर्जिकल कॉम्प्लेक्स चालू करण्यात आले. यापूर्वी ५९० खाटा होत्या; मात्र नवीन इमारत बांधल्यानंतर २५० खाटांची वाढ केली आहे. यामध्ये ऑर्थोपेडिक, नाक, कान, घसा, नेत्र आणि शस्त्रक्रिया विभाग चालू करण्यात आले आहेत.

४. खाटा वाढवल्यानंतर नियमानुसार मनुष्यबळही वाढवायला हवे होते; मात्र कर्मचार्‍यांची रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरली गेली नाहीत. सध्या परिचारिकांची ११५ पदे, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची २०० पदे, फार्मासिस्टची ६, तंत्रज्ञांची ५ आणि इतर पदे रिक्त आहेत.

५. मेयो येथील जुन्या आणि नवीन खाटांची मिळून एकूण संख्या ८३३ वर पोचली आहे. त्या तुलनेत परिचारिकांची संख्या केवळ ४७५ आहे. यांतील १० ते १५ टक्के परिचारिका विविध कारणांनी रजेवर आहेत. परिचारिकांवरही कामाचा ताण वाढला आहे.

६. अनेक प्रभागांत केवळ २ परिचारिका आहेत. अशा परिस्थितीत अनेक वेळा कुटुंबातील सदस्यांना परिचारक म्हणून काम करावे लागते, तसेच मेडिकल रुग्णालयात १ सहस्र ४०० खाटांना मान्यता मिळाली असली, तरी रुग्णांची वाढती संख्या पहाता वाढील ५०० खाटांसह काही नवीन विभागही चालू करण्यात आले आहेत.