मुंबईत उर्दू शाळांनी मराठी पटसंख्येला टाकले मागे, पटसंख्येत मराठी शाळा ४ थ्या क्रमांकावर !

प्रतिवर्षी ५ सहस्र विद्यार्थ्यांमध्ये होत आहे घट !

मराठी शाळांची भयावह स्थिती

मुंबई, ७ डिसेंबर (वार्ता.) – काही वर्षांपूर्वी सर्वाधिक मराठी विद्यार्थी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा पटसंख्येत ४ थ्या क्रमांकापर्यंत मागे गेल्या आहेत. पटसंख्येत इंग्रजी, उर्दू आणि हिंदी अन् त्यानंतर मराठी शाळांचा क्रमांक येतो. मागील १० वर्षांत मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ४९ टक्क्यांनी घटली आहे. यानुसार मराठी शाळांतील ५ सहस्र १३५ विद्यार्थी प्रतिवर्षी घटत आहेत. अशीच स्थिती राहिली, तर ‘येत्या काही वर्षांत पटसंख्येच्या अभावामुळे मुंबईतील मराठी शाळा बंद पडतील’, असे घटत्या आकडेवारीतून दिसत आहे. प्रजा फाऊंडेशनला माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीतून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

प्रजा फाऊंडेशनद्वारे ५ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी याविषयीची कागदपत्रे पत्रकारांना देण्यात आली. या माहितीतून मराठी शाळांची भयावह स्थिती उघड होत आहे. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १ लाख १ सहस्र ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच्या खालोखाल उर्दू शाळांमध्ये ८० सहस्र ६११, हिंदी शाळांमध्ये ७६ सहस्र ९९० विद्यार्थी, तर मराठी शाळांमध्ये ५१ सहस्र ६९१ विद्यार्थी शिकत आहेत. वर्ष २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३ सहस्र ४८ इतकी होती. वर्ष २०२१-२२ मध्ये मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ५१ सहस्र ६९१ इतकी आहे.

मागील १० वर्षांत मराठी शाळांतील ५१ सहस्र ३५७ विद्यार्थी न्यून झाले आहेत. शाळांतील पटसंख्येची आकडेवारी पहाता वर्ष २०१२-१३ या शैक्षणिक वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ५७ सहस्र २३५ विद्यार्थी शिकत होते. वर्ष २०२१-२२ मध्ये मात्र इंग्रजी माध्यमांतील शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १ सहस्र ११० इतकी झाली आहे. यातून मराठी शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा ओढा मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्याचे दिसून येत आहे. मराठीसह हिंदी आणि उर्दू शाळांतील विद्यार्थीही इंग्रजी शाळांमध्ये जात असल्याचे दिसून येत आहे; मात्र तुलनेत मराठी शाळांतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे वळण्याचे प्रमाण अधिक आहे.