श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भावपूर्ण रितीने केलेल्या प्रार्थनेमुळे आलेली अनुभूती आणि त्यांच्यातील देवीतत्त्वाची लोकांना येत असलेली प्रचीती !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. वर्ष २०२१ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या दिवशी महर्षींनी अकस्मात् तिरुपती येथे जाण्यास सांगणे

१ अ. तिरुपती दर्शनाची पाच तिकिटे न मिळता केवळ दोनच तिकिटे मिळणे : ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या दिवशी महर्षींनी आम्हा सर्वांना, म्हणजे पाचही जणांना तिरुपती येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला तिरुपती दर्शनाची दोनच तिकिटे मिळाली आणि तीन साधकांना तिकिटे मिळाली नाहीत. सकाळी लवकर दर्शन घ्यायचे असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच तिथे मुक्कामाला गेलो होतो. रात्री झोपण्यापूर्वी आम्ही श्रीचित्‌‌शक्ति (सौै.) गाडगीळकाकू आणि श्री. विनायक शानभाग या दोघांची दर्शनाला जाण्याची सिद्धता केली.

१ आ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी रात्री झोपण्यापूर्वी देवाला प्रार्थना करणे आणि नंतर केवळ अर्ध्या घंट्याने ‘आणखी तीन तिकिटे मिळाली असून तुम्ही दर्शन घ्यायला येऊ शकता’, असा निरोप मिळणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रात्री झोपण्यापूर्वी देवाला प्रार्थना केली, ‘हे तिन्ही साधक घर सोडून तुझ्याच सेवेसाठी आले आहेत. ते तुझी सेवा निःस्वार्थपणे करत आहेत. त्यामुळे ‘त्यांना दर्शन द्यायचे कि नाही’, हे तूच ठरव.’ नंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) काकू झोपल्या आणि केवळ अर्ध्या घंट्याने आम्हाला निरोप आला, ‘तुम्हाला आणखी तीन तिकिटे मिळाली आहेत. त्यामुळे तुम्ही दर्शन घ्यायला येऊ शकता !’ त्या दिवशी आम्हाला बालाजीचे दर्शन अगदी चांगल्या प्रकारे झाले.

श्री. वाल्मिक भुकन

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी परिसरात पायरीवर बसून नामजप करणे, तेथून जाणार्‍या अनेकांनी त्यांना नमस्कार करणे आणि ४ – ५ स्त्रियांनी ‘त्या देवीसारख्या दिसल्या; म्हणून त्यांचे दर्शन घ्यायला आलो’, असे सांगणे

तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर बाजूला वराहस्वामींचे दर्शन घेऊन श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि मी बाहेर पायरीवर बसलो होतो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) काकू तेथे डोळे बंद करून नामजप करत होत्या. आम्ही बसलो होतो, त्या ठिकाणाहून बरेच लोक जात होते. ते श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे बघत होते आणि त्यांना लांबून नमस्कार करत होते.

चाळीस जणांचा एक गट तिथून जात होता. ते सर्व जणही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना लांबून नमस्कार करत होते. त्यातील ४ – ५ स्त्रिया आमच्याजवळ आल्या आणि त्या श्रीचित्‌‌शक्ति काकूंना वाकून नमस्कार करू लागल्या. तेव्हा मी त्या स्त्रियांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) काकू यांच्याविषयी माहिती सांगितली. तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, ‘‘आम्हाला याविषयी काही ठाऊक नाही; पण आम्हाला त्या देवीसारख्या दिसल्या. त्यामुळे आम्ही त्यांचे दर्शन घ्यायला आलो.’’

तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील चैतन्य समाजातील लोकांच्याही लक्षात येते’, हे आम्ही अनुभवले.

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (१२.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक