स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

मौलवींच्या दबावापुढे केरळमधील साम्यवादी सरकार झुकले !

थिरूवनंतपूरम् – केरळ सरकारच्या वतीने गरिबी निर्मूलनासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘कुडुंबश्री’ योजनेशी ‘संबंधित ‘मुलगा आणि मुलगी समानते’च्या शपथेवरून वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून ‘कुडुंबश्री’ योजनेच्या अंतर्गत स्वयंसेवी  साहाय्य गटांनी त्यांच्या स्वयंसेवकांना ‘मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार द्या. मुला-मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार देऊ’, अशी शपथ घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मौलवींनी ही शपथ शरीयत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत विरोध दर्शवला. मौलवींच्या दबावापुढे झुकत राज्यातील साम्यवादी सरकारने या शपथेवर बंदी घातली आहे.(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)


१. केरळमधील ‘समस्थ  केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ या मुसलमानांच्या संघटनेने ‘कुडुंबश्री’ योजनेला विरोध केला आहे. ‘या शपथेच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र  सरकारला समान नागरी कायदा लागू करण्यासाठी साहाय्य करत आहे’, असे मौलवींनी म्हटले आहे.

२. ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’चे नेते नजर फैजी कुडथाई यांनी फेसबुकवर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून ही शपथ घटनेच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. कुराणानुसार पुरुषाला दोन स्त्रियांइतका मालमत्तेत वाटा मिळतो आणि वडिलांच्या मालमत्तेतून पुरुषाला मिळणार्‍या संपत्तीपैकी केवळ अर्धा हिस्सा स्त्रीला दिला जातो. ‘लिंग समानतेच्या नावाखाली सरकार इस्लामच्या मूलभूत तत्त्वांमध्ये हस्तक्षेप करत आहे’, असे  फैजी यांनी म्हटले आहे. फैजी कुदथाई यांच्या या वक्तव्यानंतर जमात-ए-इस्लामीसह इतर अनेक मुसलमान संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला.

हिंदूंच्या विरोधात निर्णय घेणारे आता कुठे आहेत ? – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी म्हटले की, कट्टरतावाद्यांच्या शक्तीसमोर सरकारने आत्मसपर्मण केले आहे. शबरीमला मंदिरात सर्व गटांतील महिलांना प्रवेश मिळण्याच्या निर्णयाला सहस्रो तीर्थयात्रेकरूंनी विरोध केल्यावर त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांनी २ महिलांना संरक्षण देत मंदिरात प्रवेश करू दिला.

संपादकीय भूमिका

  • हे आहे केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !
  • शबरीमला मंदिरात हिंदूंच्या प्रथेला विरोध करून सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश मिळण्याविषयी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तेच सरकार मुसलमान स्त्रियांना मात्र समान अधिकार देण्यास उत्सूक नाही. यावरून साम्यवादी  सरकारचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम दिसून येते !