मोगलप्रेमी विचारवंत !

निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंता मुळसावळगी

मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !, असे वक्तव्य कर्नाटकातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंता मुळसावळगी यांनी केले. ‘मोगलांनी भारतात हिंदूंचे काय केले ?’, हा इतिहास आहे. तो दडपला गेला. आता खरा इतिहास समोर येत आहे. त्याविषयी अनेक माध्यमांतून विचारमंथनही होत आहे. भारतात बहुतांश मुसलमानांना मोगल आक्रमणकर्ते प्रिय आहेत, ही गोष्ट लपून राहिलेली नाही; मात्र त्याही पुढे जाऊन देशातील अनेक बुद्धीजीवी, प्राध्यापक, कथित विचारवंत, प्राध्यापक यांनाही ते प्रिय आहेत, ही शोकांतिका आहे. यांतील बहुतांश हिंदु आहेत, हे येथे खेदाने नमूद करावे लागते. बहुतांश मुसलमानांना मोगल आवडतात, हे एक वेळ समजू शकतो; मात्र हिंदूंनाही ते आवडणे, हे अपयश कुणाचे ? अकबर, शहाजहां, औरंगजेब आदी मुसलमान आक्रमणकर्त्यांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार, हे आसुरांना लाजवेल, असे आहेत. बरं, हा पिढ्यान्पिढ्या तोंडी सांगितलेला इतिहास नाही. याविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. याविषयी हिंदु इतिहासकारांनी लिहिले आहेच; मात्र त्याही पुढे जाऊन मोगल आक्रमकांच्या दरबारात काम करणारे लिपिक, तसेच अन्य सरदार आदींनी लिहून ठेवलेल्या कागदपत्रांमधून हे समोर येते. त्यामुळे हा इतिहास नाकारणे, हा इतिहासद्रोह आहे. मोगल आक्रमणकर्त्यांना हिंदू पुरून उरले; म्हणून ते शिल्लक राहिले. उत्तरेत राजपूत आणि शीख अन् दक्षिणेत मराठे राजे यांनी वेळोवेळी मोगलांना शह दिला.

भारतात तलवारीच्या बळावर इस्लाम फोफावत असतांना हिंदूंसाठी स्वतःची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता टिकवणे महत् कठीण काम होते; मात्र आपल्या पूर्वजांनी हे टिकवून ठेवण्यासाठी मोठा त्याग केला. त्यामुळे हिंदू आणि हिंदु धर्म भारतात टिकून राहिला. याकडे दुर्लक्ष करून ‘मोगल हिंदूंशी सौहार्दपणे वागल्यामुळे हिंदू जिवंत राहिले’, असे म्हणणे, हे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. इस्लामी आक्रमण हिंदूंनी परतवून लावले,  हे श्रेय हिंदूंचे. मुळसावळगी यांच्यासारख्या कथित विचारवंतांची हे समजून घेण्याची सिद्धता नाही. त्यामुळे मिळेल त्या व्यासपिठावरून ते अशी हिंदुद्वेषी विधाने करतात. भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आळा कोण घालणार ? अशा मानसिकतेच्या निवृत्त न्यायाधिशाने न्यायदान कसे केले असेल ? खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कायद्याचा अभ्यास आणि दोन्ही पक्षांनी मांडलेली बाजू याचा सारासार विचार करून निवाडा द्यावा लागतो; मात्र हिंदूंच्या देवतांना ‘कादंबर्‍यांमधील व्यक्तीरेखा’ संबोधणारे, ‘बौद्धांचे मठ हिंदु राजांनी पाडले’, असे म्हणणारे आणि भारतातील सौहार्दता हिंदूंनी बिघडवल्याचे सांगणारी व्यक्ती जेव्हा दंगलींसारख्या महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये न्यायदान करणार असेल, तर ती तत्त्वनिष्ठपणे, विशिष्ट समाजाला झुकते माप न देता ते करेल, याची शाश्वती काय ? त्यामुळे अशांनी दिलेल्या निवाड्यांची चौकशी करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?