सातारा, ५ डिसेंबर (वार्ता.) – सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कार्यालयातच एका खासगी ठेकेदाराचा वाढदिवस साजरा केला आहे. हे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अन् शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध विभागांची स्थापना केली. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मात्र सामान्य नागरिकांची कामे करण्यापेक्षा धनदांडगे ठेकेदार पोसण्याचे आणि त्यांचे लांगूलचालन करण्याचे काम चालू आहे. २ डिसेंबर या दिवशी एका खासगी ठेकेदाराचा वाढदिवस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयातील पटलावरच केक कापून साजरा केला. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून शासकीय जागेची तमा न बाळगता तेथेच वाढदिवस साजरा करणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.