मुंबईतील आग्रीपाडा या हिंदूबहुल वस्तीत ‘उर्दू लर्निंग सेंटर’ बांधण्याचे षड्यंत्र !

  • स्थानिक हिंदू उतरले रस्त्यावर !

  • ‘उर्दू लर्निंग सेंटर’साठी मुंबई महानगरपालिकेकडून १२ कोटींचा निधी !

  • आंदोलनात आमदार नीतेश यांचा सहभाग !

आंदोलनात बोलतांना नीतेश राणे आणि सहभागी आंदोलक

मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईतील आग्रीपाडा या हिंदूबहुल वस्तीमध्ये मुंबई महानगरपालिकेने ‘उर्दू लर्निंग सेंटर’ उभारण्याचे षड्यंत्र रचले आहे. विशेष म्हणजे ‘उर्दू लर्निंग सेंटर’साठी या भूमीवरील ‘कौशल्य विकास केंद्रा’चे आरक्षण महानगरपालिकेने तातडीने हटवून ‘उर्दू लर्निंग सेंटर’साठी १२ कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. ‘स्थानिक मराठी युवकांना रोजगार कौशल्य प्रशिक्षण देणार्‍या केंद्राचे आरक्षण नाकारून हिंदूबहुल भागात ‘उर्दू लर्निंग सेंटर’ कशासाठी ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत ४ डिसेंबर या दिवशी स्थानिक आग्रीपाडा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे आमदार नीतेश राणे सहभागी झाले होते.

सकाळी ११ वाजता आग्रीपाडा येथे आंदोलनाला प्रारंभ झाला. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधीही या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या. आग्रीपाडा येथील श्री साईबाबा मंदिराच्या येथून आंदोलनाला प्रारंभ झाला. आंदोलक काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी आंदोलकांना अडवले. या वेळी आमदार नीतेश राणे यांनी ‘उर्दू लर्निंग सेंटर’पर्यंत आंदोलन नेण्याची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी तिथे आंदोलकांना जाऊ दिले. आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत असतांना उर्दू भाषाभवन कशासाठी ? – नीतेश राणे, आमदार, भाजप

आमच्या मुंबईमध्ये उर्दू भाषाभवन का हवे ? मुंबईसह राज्यातील मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात उर्दू भाषाभवन काय करायचे ? कुणाचीही भाषा आणि धर्म यांच्या विरोधात आम्ही नाही. मुंबईमध्ये उर्दू भाषाभवन बांधायचे असेल, तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती आहे, तेथे बांधा. ‘मराठी पर्यायाने हिंदु ज्या ठिकाणी रहातात, त्या ठिकाणी ‘उर्दू लर्निंग सेंटर’ कशासाठी ?’, याचे उत्तर आम्हाला मिळायला हवे.

मुंबईमध्ये पाणी तुंबले, रस्ते खराब झाले, तर महानगरपालिका एवढ्या तत्परतेने काम करतांना दिसत नाही; मात्र तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात ‘उर्दू लर्निंग सेंटर’ला मुंबई महानगरपालिकेने केवळ १० मासांत अनुमती देऊन १२ कोटी रुपयांची तरतूदही केली. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र होणार होते. यामध्ये यातून मराठी युवकांना नोकर्‍या आणि त्याविषयीचे प्रशिक्षण मिळाले असते. ‘असे असतांना कौशल्य विकास केंद्राची मान्यता का रहित करण्यात आली ?’, याचे उत्तर मुंबईकरांना मिळायला हवे. नवाब मलिक कौशल्य विकासमंत्री असतांना हे काम झाले आहे.

हिंदूंकडे वाकड्या दृष्टीनेे बघाल, तर ते सहन केले जाणार नाही !

आता राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. कुणी हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही धडा शिकवल्याविना रहाणार नाही. आमच्या अंगावर आलात, तर आम्ही गप्प रहाणार नाही. छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहून हिंदूंकडे वाकड्या दृष्टीनेे बघाल, तर सहन केले जाणार नाही. येथे कौशल्य विकास केंद्रच व्हायला हवे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काम पूर्ण करतील. येथे उर्दू लर्निंग सेंटर बांधले जाणार नाही, असा मी शब्द देतो, असे आश्‍वासन या वेळी आमदार नीतेश राणे यांनी दिले.

संपादकीय भूमिका

मुसलमानबहुल भागात ‘संस्कृत लर्निंग सेंटर’ बांधण्याचे धारिष्ट्य प्रशासनाने केले असते का ? असे करण्याचा प्रयत्न जरी झाला असता, तरी त्याचे परिणाम काय झाले असते, हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक आहे ! हिंदू सहिष्णु असल्यामुळेच त्यांना गृहित धरून असले प्रकार केले जातात !