चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपिठासाठी शासनाकडून २ हिंदु पुजार्‍यांची नेमणूक !

कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – येथील दत्तपिठात २ हिंदु पुजार्‍यांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. कार्यकारी मंडळाच्या शिफारसीनुसार मूळचे शृंगेरी येथील श्रीकांत आणि चिक्कबळ्ळापूर येथील संदीप अशा २ हिंदु पुजार्‍यांची नेमणूक करण्यात आल्याचे राज्यशासनाने घोषित केले आहे. पुजार्‍यांच्या नेमणुकीच्या संदर्भात राज्यशासनाने कार्यकारी मंडळाची रचना केली होती. या कार्यकारी मंडळात एका मुसलमान सदस्यासह ८ लोक होते. पुजार्‍यांच्या नेमणुकीचा अधिकार कार्यकारी मंडळाला असल्याचे राज्यशासनाने परिपत्रकात नमूद केले आहे. त्यानुसार कार्यकारी मंडळाने २ पुजार्‍यांची नेमणूक करून आदेश काढला आहे. हे दत्तपीठ नसून बाबाबुडनगिरी यांचा दर्गा असल्याचा मुसलमानांचा दावा आहे. येथे हिंदु आणि मुसलमान दोघेही दर्शनासाठी येत असतात.

चिक्कमगळुरू येथील वादग्रस्त बाबा बुडनगिरी दत्तपिठात डिसेंबर ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती साजरी करण्याला कर्नाटक उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. दत्तपिठात दत्तजयंती साजरी करण्यात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देणार्‍या प्रवाशांवर ५ दिवसांचा निर्बंध घालण्यात आला आहे.  याविषयी माहिती देतांना जिल्हाधिकारी के.एन्. रमेश म्हणाले की, या काळात प्रवाशांनी उपाहारगृह, रिसॉर्ट आदी ठिकाणी निवास करण्यासाठी आरक्षित केले असेल, तर तेथे वास्तव्य करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, असे स्पष्ट केले.