जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

बोधप्रद ज्योतिष लेखमाला

‘हिंदु समाजात बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय ? आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते ?’, याविषयी समजून घेऊया.

लेखांक ५.

१. जन्मपत्रिका म्हणजे काय ?

जन्मपत्रिका म्हणजे व्यक्तीच्या जन्मवेळी आकाशात असलेल्या ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीविषयी माहिती देणारी पुस्तिका. ज्याप्रमाणे वैद्यकीय अहवालात व्यक्तीच्या शारीरिक घटकांविषयी माहिती दिलेली असते, त्याप्रमाणे व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत तिच्या जन्मकालीन खगोलीय घटनांविषयी माहिती दिलेली असते. जन्मपत्रिकेतील माहितीचा उपयोग करून ज्योतिषी भविष्य दिग्दर्शन करतो. जन्मपत्रिकेतील काही माहिती स्वतः त्या व्यक्तीसाठीही उपयुक्त असते. त्याचे विवरण पुढे दिले आहे.

कुंडली

१ अ. सामान्य माहिती : पत्रिकेच्या आरंभी संबंधित व्यक्तीचे नाव, जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मस्थळ लिहिलेले असते.

१ आ. जन्मदिवसाचे पंचांग : व्यक्तीच्या जन्मवेळी असलेली ‘तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण’ ही ५ अंगे पत्रिकेत नमूद केलेली असतात.

१ इ. कालमापनाचे घटक : व्यक्तीच्या जन्मवेळी असलेले संवत्सर (वर्ष), अयन (उत्तरायण-दक्षिणायन), ऋतु (वसंत, ग्रीष्म इत्यादी), मास (महिना) आणि पक्ष यांची माहिती पत्रिकेत असते.

श्री. राज कर्वे

१ ई. जन्मनक्षत्राची वैशिष्ट्ये : जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल, ते व्यक्तीचे ‘जन्मनक्षत्र’ होत. सर्व ग्रहांच्या तुलनेत चंद्र हा पृथ्वीच्या सर्वांत जवळ असल्याने त्याच्या सूक्ष्म ऊर्जेचा (आपतत्त्वाचा) आणि स्थूल ऊर्जेचा (गुरुत्वाकर्षणाचा) अशा दोन्ही स्तरांवरील ऊर्जांचा पृथ्वीवर परिणाम होतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात चंद्रनक्षत्राला (जन्मनक्षत्राला) अधिक महत्त्व दिलेले आहे. जन्मनक्षत्राशी संबंधित देवता, दानवस्तू, आराध्यवृक्ष, वर्णाक्षर आदींची माहिती पत्रिकेत दिलेली असते. त्यांचा उपयोग विविध प्रसंगी होतो.

१ उ. फलित : काही पत्रिकांमध्ये छापील फलित (भविष्य) दिलेले असते. ते फलित संगणकीय प्रणालीद्वारे (‘सॉफ्टवेअर’द्वारे) बनवलेले असल्याने त्यात तथ्य अत्यल्प असते; परंतु ज्या पत्रिकेत ज्योतिषाने स्वतः अभ्यास करून कुंडलीचे फलित लिहिले असेल, त्या फलिताचा उपयोग व्यक्तीला आयुष्यात मार्गक्रमण करतांना होतो.

२. कुंडली म्हणजे काय ?

कुंडली हा पत्रिकेतील मुख्य भाग आहे. कुंडली म्हणजे आकाशाचा आकृतीबद्ध नकाशा. कुंडलीतील १२ स्थानांमध्ये ग्रह आणि राशी दर्शवलेले असतात. जन्मकुंडलीवरून ‘व्यक्तीच्या जन्मवेळी आकाशात कोणते ग्रह कोणत्या दिशांमध्ये होते ? ते कोणत्या राशींमध्ये होते ? ते एकेमकांपासून किती अंश दूर होते ?’, आदी माहिती लगेच कळते. पत्रिकेत लग्नकुंडली, राशीकुंडली, वर्गकुंडली इत्यादी विविध प्रकारच्या कुंडल्या दिलेल्या असतात. त्यांचा उपयोग ज्योतिषी भविष्याचे दिग्दर्शन करतांना विविध कारणांसाठी करतात.

३. बाळाचा जन्म झाल्यानंतर किती दिवसांनी जन्मपत्रिका बनवून घ्यावी ?

बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच म्हणजे २-३ दिवसांत जन्मपत्रिका बनवून घ्यावी; कारण जन्मपत्रिका बनवतांना ‘बाळाचा जन्म कोणत्या योगावर झाला ?’, हे ज्योतिषी पहातो. काही अशुभ तिथी, नक्षत्र आणि योग यांवर जन्म झाल्यास बाळाला त्याचा त्रास होऊ नये; म्हणून शास्त्राने जननशांती करण्यास सांगितली आहे. ही जननशांती जन्मानंतर बाराव्या दिवशी केली जाते. जन्मपत्रिका बनवून घेण्यास उशीर केल्यास जननशांती करण्यास विलंब होतो. जननशांती अधिक विलंबाने केल्याने तिची परिणामकारकता अल्प होते.

४. जन्मपत्रिका बनवणार्‍या ज्योतिषाला कोणती माहिती द्यावी ?

जन्मपत्रिका अभ्यासू आणि सदाचरणी ज्योतिषाकडून बनवून घ्यावी. ज्योतिषाला बाळाचा जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मस्थळ यांची अचूक माहिती सांगावी; कारण या तीन गोष्टींवरून जन्मपत्रिका बनवली जाते. नवजात बाळाविषयी काही वैचित्र्य आढळल्यास तेसुद्धा ज्योतिषाला सांगावे, उदा. बाळाला जन्मतः दात असणे, अवयव अधिक असणे किंवा अल्प असणे इत्यादी.

५. जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व

जन्मकुंडली ही दिशा आणि काळ यांचा मनुष्याशी असणारा संबंध दर्शवते. पूर्वजन्मांत केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांची फळे मनुष्य प्रारब्धरूपाने पुढील जन्मांत भोगतो. व्यक्तीचे प्रारब्ध जाणून घेण्याचे कुंडली हे एक माध्यम आहे. जन्मकुंडलीद्वारे जीवनात लाभलेली उपलब्धी, काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता, सुख-दुःख, अरिष्ट इत्यादींचा बोध होतो. त्यामुळे आपल्या जीवनाचे स्वरूप कळण्यासाठी जन्मपत्रिका साहाय्यक ठरते.

६. जन्मपत्रिका जपून आणि सहजतेने सापडेल अशा ठिकाणी ठेवावी

मुंज, विवाह इत्यादी मंगलकार्यांच्या प्रसंगी, तसेच काही वेळा आपत्कालीन परिस्थितीत जन्मपत्रिकेची आवश्यकता असते. जन्मपत्रिका नीट न ठेवल्यामुळे गहाळ झाल्यास गैरसोय होते, तसेच ती पुन्हा बनवून घेण्यासाठी वेळ आणि पैसे व्यय होतात. त्यामुळे जन्मपत्रिका जपून ठेवावी, तसेच सहजतेने सापडेल अशा ठिकाणी ठेवावी.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१०.२०२२)