‘९.२.२०२० या दिवशी मी एका नातेवाइकांना भेटायला गेले होते; कारण ते हृदयविकाराने आजारी होते. त्या वेळी मी मनाशी ठरवले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेत आहेत. आता आपण नात्यांमधील दुरावा दूर करून साधकभेटीचा आनंद घ्यायचा.’ त्यांना भेटायला जाण्यापूर्वी माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी त्या कुटुंबियांची मानस क्षमा मागितली आणि ‘ते कुटुंब म्हणजे साधकच आहेत’, असा भाव ठेवला. नंतर देवकृपेने मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.
१. ‘त्या कुटुंबातील मुख्य स्त्री तिच्या कुटुंबासाठी पुष्कळ कष्ट करते, तसे कष्ट मी देवाच्या प्राप्तीसाठी घ्यायला पाहिजेत’, याची जाणीव होऊन मला देवाप्रती कृतज्ञता वाटली.
२. नातेवाइकांनी त्यांच्या मुलांवर शिक्षणासमवेतच चांगले संस्कार केल्याचे लक्षात येणे : त्या कुटुंबातील एका मुलीला दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले होते आणि तिने बारावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. त्या दृष्टीने तिने १२ घंट्यांचे अभ्यासाचे उत्तम नियोजन करून ‘ते पटकन दिसेल’, अशा प्रकारे पटलावर (टेबलावर) ठेवले होते. ती १२ घंटे अभ्यास करून आईला काही कामांतही साहाय्य करत होती. तेव्हा देवाने मला तिच्या माध्यमातून ‘ध्येय ठरवून त्याची जाणीव कशी ठेवायची ?’, हे शिकवले. अशा प्रकारे त्या मुलांवर त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणासमवेतच चांगले संस्कार केल्याचे माझ्या लक्षात आले.
३. ‘पूर्वग्रह’ दूर झाल्याने नात्यातील सात्त्विक आनंद अनुभवता येणे : देवाने माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून माझ्या डोळ्यांवर असलेली ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची पट्टी दूर केली. वरील सूत्रे शिकायला मिळाल्यावर आम्हा नातेवाइकांमधील दुरावा संपुष्टात आला आणि मला नात्यातील सात्त्विक आनंद मिळाला.
‘हे देवा, तू माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेतलीस अन् मला नातेवाइकांचे गुण लक्षात आणून दिलेस, यासाठी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (११.२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |