मुसलमान मुली पंधराव्या वर्षी स्वतःच्या इच्छेने लग्न करू शकतात ! – झारखंड उच्च न्यायालय

रांची (झारखंड) – झारखंड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मुसलमान मुलीला वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पुरुषाशी लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे. मुस्लिम कायद्यानुसार मुसलमान मुली वयाच्या १५ व्या वर्षी तारुण्यात येतात. त्यामुळे या कायद्यानुसार त्यांनी पंधराव्या वर्षी विवाह करणे वैध आहे, असे  उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

१. बिहारमधील नवादा येथे रहाणारा २४ वर्षीय महंमद सोनू याने झारखंडमधील जमशेदपूर येथील १५ वर्षीय मुसलमान मुलीला लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेले.

२. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांची मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती.

३. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी चालू होती.

४. मुलीच्या अधिवक्त्याने न्यायालयाला सांगितले की, महंमद सोनू याने मुलीसोबत लग्न केले आहे. आता दोघेही कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे या प्रकरणातील फौजदारी कारवाईची प्रक्रिया थांबवण्यात यावी.

५. तसेच मुलीच्या वडिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांनी ‘गैरसमजामुळे’ महंमद सोनू याच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.

६. यानंतर उच्च न्यायालयाने १५ वर्षीय मुलीशी लग्न करणार्‍या महंमद सोनू याच्यावरील प्रलंबित असलेली फौजदारी कारवाई रहित केली.