सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !
साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !
‘बर्याच साधकांना तीव्र किंवा मध्यम आध्यात्मिक त्रास आहे. ‘व्यष्टी वा समष्टी साधनेत चुका झाल्यास काही साधकांच्या मनात ‘मला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे ही चूक झाली’, असा विचार येत असल्याचे लक्षात आले आहे.
खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. वाईट शक्ती आध्यात्मिक त्रासाचा अपलाभ घेऊन साधकांमध्ये मुळात असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे झालेल्या चुकांविषयी अंतर्मुखतेने चिंतन न करता आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधकांच्या साधनेची हानी होते.
साधकांनी कोणतीही चूक झाल्यावर त्यामागील मूळ स्वभावदोष अथवा अहं यांच्या पैलूंचे चिंतन करावे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.’
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.