विद्यार्थ्यांसमोर आदर्शांची आवश्यकता ! – सौ. रेणू दांडेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी – आपली तत्त्व ठाम असावी लागतात. आपण आचारात, विचारात पालट करायला हवा आहे. माझा विकास म्हणजे दुसर्‍याला त्रास नव्हे, तर सर्वांचा विकास हवा. संत ज्ञानेश्‍वरांनीही ज्ञानेश्‍वरी लिहिली, हाही मोठा पालट आहे. लोकांसाठी लिहिले म्हणून ज्ञानेश्‍वरी लोकज्ञान झाले. अनेक लेखकांनी पुस्तकी ज्ञान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची पिढी नेहमीच आपल्यापेक्षा पुढे आणि अद्ययावत असते; मात्र त्यांच्यासमोर चांगल्या आदर्शांची आज आवश्यकता आहे. कारण मुले अनुकरण करतात. आपण चांगले वागलो, तरच हे शक्य आहे. तसेच आपण स्वतःपासूनच पालट घडवायला प्रारंभ केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सौ. रेणू दांडेकर यांनी केले.

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात डावीकडून संदीप कळके, चंद्रकांत हळबे, माधव हिर्लेकर, बोलतांना सौ. रेणुताई दांडेकर, शलाका टोळ्ये, सौ. पाध्ये आणि अमोघ पेंढारकर

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या वतीने २०२२ चे विशेष पुरस्कार आणि विद्यार्थी गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, ठाणे कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह संदीप कळके आणि पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.

सौ. रेणुताई दांडेकर

सौ. रेणू दांडेकर पुढे म्हणाल्या की, आपली कुटुंबव्यवस्था टिकायला हवी आहे. तुम्ही स्वतःला सूचना द्या, म्हणजे त्या स्वीकारायला शिकाल. मुलांना वाचा सांगताना आपणही वाचले पाहिजे. त्याकरता प्रत्येकाने योगदान द्यावे. परीक्षेतले गुण म्हणजे आयुष्य नाही. पालट मनातून व्हायला हवा आणि आपण स्वीकारायला शिकले पाहिजे.

या वेळी बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरवलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परीक्रमा पूर्ण केल्याविषयी अमोघ पेंढारकर यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. नर्मदा परिक्रमा करणार्‍या चैतन्य पाध्ये याचा पुरस्कार आईने स्वीकारला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही मनोगत व्यक्त करून कर्‍हाडे संघाचे आभार मानले. हैद्राबादमध्ये २१ कि.मी.ची मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या राजीव टोळ्ये यांनाही या वेळी गौरवण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना या वेळी सन्मानित केले.