कुंकू लावण्यामागील आध्यात्मिक कारण जाणून घेतले पाहिजे ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा

भांडुप येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु ऐक्याचा हुंकार !

उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना धर्मप्रेमी आणि जिज्ञासू

मुंबई, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या कुंकवाविषयीच्या विधानावरून वाद निर्माण करण्यात आला. ते काय चुकीचे बोलले ? कुंकू लावण्यामागील आध्यात्मिक कारण समजून घेतले पाहिजे. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो. तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वैद्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी केले. येथे २७ नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या सभेत उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. पुष्कळ धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांची उपस्थिती या प्रसंगी लाभली.

वैद्या सौ. दीक्षा पेंडभाजे उपस्थितांना मार्गदर्शन करताना

उपस्थित मान्यवर : श्री गणेश सेवा मंडळाचे कार्यवाहक श्री. चंद्रकांत परुळेकर, मंडळाचे सहकार्यवाहक श्री. विजय फडके, मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. अविनाश बापट आणि मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. रवींद्र काळे

विशेष

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात प्रख्यात असलेल्या शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाच्या कार्डिॲक (Cardiac) विभागाचे मुख्य डॉ. जयंत खांडेकर यांच्यासह त्यांचे वडील डॉ. वसंत खांडेकर (वय ९२ वर्षे) सभेस आवर्जून उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. सभेनंतर धर्मप्रेमींनी वक्त्यांसह धर्मावरील आघात, प्रत्येक मासात लहान मुलांचे साजरे करण्यात येणारे वाढदिवस, तसेच लव्ह जिहाद यांविषयी चर्चा केली. ‘हिंदु म्हणून संघटित होऊन प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी कृती करायला हवी’, असेही सर्वांनी सांगितले.

२. ‘आज मुले ‘कार्टून’ बघतात; पण त्यांना रामायण आणि महाभारत यांविषयी आपण सांगितल्यासच ते कळेल. मुलांनीही हिंदु धर्माची माहिती घ्यावी. आपल्या धर्मात पुष्कळ माहिती आहे’, असे मत कु. शंभूराजे जगदाळे (वय १३ वर्षे) याने सभेनंतरच्या बैठकीत व्यक्त करत उपस्थितांचे लक्ष वेधले. तो वडिलांसह सभेला आला होता.