हिंदु धर्माची विकासशीलता आणि कायाकल्प लक्षात घ्या !

‘पाणिनीने संस्कार केलेली भाषा ती म्हणजे संस्कृत भाषा होय. स्वतः पाणिनी आपल्या पूर्वीच्या व्याकरणकर्त्यांचा उल्लेख करतो. यावर आज प्रचंड संशोधनात्मक साहित्यही उपलब्ध आहे. हे येथे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, आपल्या धर्म संकल्पना आणि तिच्याशी निगडित असलेल्या दैवतशास्त्रापासून पूजेअर्चेपर्यंत विकास झालेला  आहे. हा धर्म सहस्रो वर्षांचा आहे.

१. हिंदु धर्मातील तत्त्वदानाचे महत्त्व ! 

गेल्या दोनचारशे वर्षांमध्ये हिंदु तत्त्वज्ञान, जीवनपद्धती आणि त्याचे प्राचीनत्व याचा अभ्यास अन् संशोधन करण्याची स्फूर्ती जगातल्या अनेक धर्मप्रचारक आणि धर्माचे अभ्यासक यांना झाली. ही जिज्ञासा हिंदु गोमांसभक्षण करतात कि करत नाहीत, हिंदूंची मूर्तीपूजा, होमहवन इत्यादींपेक्षा त्यांचे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ अर्थात् उपनिषदे आणि दार्शनिक ग्रंथ यांच्यामुळे झाली.

२. युरोपियन विचारसरणीचे गोडवे गाणारे धर्मनिरपेक्षतावादी हे सत्य लक्षात घेतील का ?  

‘१६-१७ व्या शतकापासून युरोपियन वसाहतवादाला आरंभ झाला आणि भारतीय जीवनशैलीच नाही, तर भारताच्या भौतिक आणि आधिभौतिक विचारांचा सखोल अभ्यास पाश्चात्त्यांनी चालू केला. आरंभीला फ्रेंच अभ्यासक आघाडीवर होते. फ्रेंच राजा पंधरावा लुई याच्या ग्रंथपालाने १८ व्या शतकाच्या आरंभीला भारतामध्ये धर्मप्रसारासाठी आलेल्या जेजुइट धर्मप्रचारकांना संस्कृत हस्तलिखिते जमवून आणायला सांगितली. युरोपमधल्या संस्कृतच्या शास्त्रशुद्ध हस्तलिखित संग्रहाचा हा आरंभ म्हणायला हरकत नाही. बंगालमधील चंद्रनगर येथील फ्रेंच वसाहतीतील धर्मप्रचारक जीन फ्रान्स्वोइस पॉन्स (Jean – Francois Pons) यांनी अनेक विषयांवरील संस्कृतची हस्तलिखिते जमवून त्याचे वर्गीकरण करून फ्रान्समधील या ग्रंथालयात जमा केली.

 

अँन्तोन लिओनार्द (Antoine Leonard Chezy) हे फ्रान्स आणि युरोपमधील पहिले संस्कृत शिक्षक होते. पॉन्सच्या जमा केलेल्या संस्कृत हस्तलिखितामधून ते संस्कृत शिकले. याच परंपरेतील अनेक फ्रेंच संस्कृत अभ्यासकांनी भारतीय खगोलशास्त्र, गणितशास्त्र आणि जीवनशैली यांवर अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. फ्रेंचांची ही परंपरा आजही चालू आहे. त्याहूनही अधिक मोठी परंपरा जर्मन लोकांची आहे, ती सर्वांना ज्ञातच आहे. हॉलंडपासून रशियापर्यंत बहुतेक सर्व देशांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे. दैवतशास्त्राचा अभ्यासही त्यांनी मोठ्या प्रमाणात केला असला, तरीही त्यांचे खरे आकर्षण वेद, उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्र हेच राहिले आहे.

३. भारतीय अध्यात्माचे महत्त्व !

भारतीय अध्यात्माचे मूल्य आणि आवश्यकता ही बाजारी वस्तूंच्या मूल्यापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. भारतीय जीवनशैली, देवताशास्त्रापासून स्थापत्यशास्त्रापर्यंत सखोल संशोधन झाले असले, तरीही शतकानुशतके उपनिषद आणि दार्शनिक तत्त्वज्ञानानी जगातील सर्व प्रज्ञावंतांना नवीन विचार करण्यास उद्युक्त केले आहे.

४. हिंदूंच्या सणांचे बाजारीकरण

आज आपण आपल्या सणांपासून देवतांपर्यंत सर्वांचे बाजारीकरण केले आहे. दहीहंडी असो, गणेशोत्सव असो किंवा दिवाळी असो, सणांचे नियंत्रण आज येथील राजकारण्यांनी घेऊन त्याचे व्यावसायिकीकरण केले आहे. आज आपणच आपल्या तत्त्वज्ञानाला पारखे झालो आहोत. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिवाळखोरीच याला उत्तरदायी (जबाबदार) आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दानाची मोठमोठ्या मंदिरांमधून होत असलेली लूटमार केवळ लाजिरवाणीच नाही, तर क्लेशकारक आहे. यातूनच चारित्र्यहीन, दिशाहीन, जडवादी समाज निर्माण होतो. समाजाची प्रेरणास्थळेच नष्ट झाल्यावर सगळ्याच गोष्टींवरचा त्याचा विश्वास उडतो.

हिंदु तत्त्वज्ञानाचा गंधही नसलेले आणि गळ्यापर्यंत भ्रष्टाचारामध्ये बुडालेले राजकारणी, व्यावसायिक भोंदू बाबा अन् महंत यांचे धर्मप्रेम आणि धर्मरक्षण यांची म्हणूनच गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. महाराष्ट्रात तरी हिंदूंच्या सणांवर राजकारण्यांनी घेतलेले नियंत्रण आणि त्याचे चालवलेले व्यावसायिकीकरण याचा धर्मरक्षणाशी काडीचाही संबंध नाही. हे समजून घेणे म्हणूनच आवश्यक झाले आहे.’

(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, एप्रिल २०१८)