‘विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्यांतील मंगळदोषाचा विचार केला जातो. अनेकदा व्यक्तीचा विवाह केवळ ‘मंगळदोष आहे’ म्हणून सहजतेने जुळून येत नाही. मंगळदोषाविषयी समाजात अपसमज असल्याचे दिसून येते, तथापि आता त्याचे प्रमाण न्यून होत आहे. मंगळदोषासंबंधी समज आणि गैरसमज या लेखाद्वारे समजून घेऊया.
१. मंगळदोष म्हणजे काय ?
व्यक्तीच्या जन्मकुंडलीत १, ४, ७, ८ आणि १२ या स्थानांत मंगळ ग्रह असल्यास कुंडलीत ‘मंगळदोष’ असतो. वैवाहिक जीवनासाठी असा मंगळ त्रासदायक मानला जातो. वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुष यांचे भावनिक संबंध प्रेममय असणे अावश्यक असते. त्यामुळे आयुष्यात सौख्य लाभते. सौख्य हे ‘पृथ्वी’ आणि ‘आप’ या तत्त्वांशी संबंधित आहे. (पृथ्वी तत्त्व ‘स्थैर्य’ प्रदान करते आणि आपतत्त्व ‘आनंद’ (हर्ष) प्रदान करते; त्यामुळे जीवनात सौख्य रहाते.) याउलट मंगळ ग्रह ‘अग्नितत्त्वा’चा असल्याने तो प्रबळ झाल्यास सौख्याला मारक ठरतो. क्रोध, अहंकार, कलह, अपघात, विच्छेद इत्यादी मंगळ ग्रहाचे अनिष्ट परिणाम आहेत.
२. मंगळदोषामुळे होणारी हानी
‘मंगळदोषामुळे अधिकतर विवाह जुळण्यास अडथळे येऊन विवाह होण्यास विलंब होतो’, असा अनुभव आहे. तसेच मंगळ ग्रह कुंडलीत ज्या स्थानात असेल, त्या स्थानासंबंधी समस्या निर्माण होतात. मंगळ ग्रह प्रथम स्थानात असल्यास व्यक्तीचा स्वभाव आक्रमक असणे, चतुर्थ स्थानात असल्यास कौटुंबिक सुख न लाभणे, सप्तम स्थानात असल्यास पती-पत्नीचे न पटणे, अष्टम स्थानात असल्यास अपघाताचे प्रसंग येणे आणि बाराव्या स्थानात असल्यास आर्थिक किंवा आरोग्याची हानी होणे, असे परिणाम सामान्यतः मिळतात; परंतु असे परिणाम मिळणे, हे ‘कुंडलीत मंगळ ग्रह किती बलवान आहे ? आणि त्याच्याशी अन्य ग्रहांचे योग कसे आहेत ?’, यावर अवलंबून असते. त्यामुळे मंगळदोष असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीव्र अनिष्ट फळे मिळतील, असे मुळीच नाही.
३. ‘कुंडलीत मंगळदोष आहे का ?’, याची ज्योतिषाकडून खात्री करून घ्यावी
कुंडलीतील १, ४, ७, ८ आणि १२ या स्थानांत असलेला मंगळ ग्रह बलवान नसल्यास त्याचे परिणाम सौम्य होतात. पंचांगात असे अनेक अपवाद दिले आहेत, ज्यामुळे मंगळदोष ग्राह्य धरत नाहीत, उदा. मंगळ त्याच्या नीच राशीत (कर्क राशीत) असणे, मंगळ मिथुन किंवा कन्या या राशीत असणे, मंगळावर शुभ ग्रहाची दृष्टी असणे इत्यादी. या अपवादांमुळे मंगळदोष असलेल्या ६० ते ७० टक्के जन्मकुंडल्यांमध्ये मंगळदोष सौम्य होतो. त्यामुळे मंगळदोषाच्या संदर्भात ‘कुंडलीत खरोखर मंगळदोष आहे का ?’, याची ज्योतिषाकडून खात्री करून घ्यावी.
४. उपाय केल्याने मंगळदोष नष्ट होतो का ?
कुंडलीत प्रबळ मंगळदोष असल्यास मंगळ ग्रहाची शांती आणि जप केला जातो. हे उपाय केल्यामुळे मंगळ ग्रहाचा दूषित प्रभाव अल्प होऊन विवाह जुळण्यास आणि निर्विघ्नपणे पार पडण्यास साहाय्य होते. शांती आणि जप यांचा परिणाम ५ ते ६ मास टिकतो. शांती आणि जप यांमुळे मंगळदोष कायमस्वरूपी नष्ट होत नाही; कारण ग्रहदोष म्हणजे आपण पूर्वजन्मांमध्ये केलेल्या अनुचित कर्मांचा परिपाक असतो.
५. मंगळदोष असल्यास व्यक्तीने घ्यावयाची काळजी
मंगळदोष अधिकतर वैवाहिक जीवनात त्रासदायक असल्याने व्यक्तीने संयम आणि सहनशीलता वाढवणे आवश्यक असते. दुसर्याला समजून घेणे, त्याच्या मताचा आदर करणे, स्वतःहून साहाय्य करणे, मनमोकळेपणे बोलणे आदी गुण वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास वैवाहिक जीवन सुखमय राहील. याच्या जोडीला कुटुंबियांसाठी वेळ देणे, आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे आणि शस्त्र, यंत्र, वाहन आदी वस्तू लक्षपूर्वक हाताळणे आवश्यक आहे.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.११.२०२२)