‘प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी मानवाच्या कल्याणासाठी अनेक शास्त्रे निर्माण केली. त्यांपैकी वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही २ महत्त्वाची शास्त्रे आहेत. ही दोन्ही शास्त्रे मनुष्याच्या व्यक्तीगत जीवनाशी संबंधित आहेत. या २ शास्त्रांमधील काही समान सूत्रांमुळे त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. या लेखाद्वारे आपण वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचे महत्त्व, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये असलेला संबंध समजून घेऊ.
१. दिशा आणि काळ यांचे महत्त्व
विश्वातील कोणताही जीव किंवा वस्तू ही ‘दिशा’ आणि ‘काळ’ यांच्या अधीन असते. कोणतीही घटना विशिष्ट स्थळ आणि विशिष्ट काळ यांच्या आश्रयाने घडते. दिशा आणि काळ एकमेकांशी जोडलेले असतात; त्यामुळे संस्कृतमध्ये त्यांना संयुक्तपणे ‘दिक्काल’ असे म्हटले जाते. दिशा आणि काळ यांचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
१ अ. दिशा : एखादी वस्तू आपल्यापासून ‘पुढे किंवा मागे, वर किंवा खाली आणि उजवीकडे किंवा डावीकडे आहे’, याचे ज्ञान दिशेमुळे होते. दिशा ही स्थळसापेक्ष असते; म्हणजे व्यक्तीने तिचे स्थळ पालटल्यावर तिच्या सभोवतालच्या गोष्टी तिला अगोदरच्या तुलनेत निराळ्या दिशांना दिसतात, उदा. एखादी व्यक्ती गुजरात राज्यात असेल, तर तिच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य तिच्या दक्षिण दिशेला असते. तीच व्यक्ती कर्नाटक राज्यात आली, तर तिच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य तिच्या उत्तर दिशेला असते.
१ आ. काळ : एखाद्या गोष्टीत झालेले परिवर्तन (बदल) हे काळामुळे समजते. विश्वातील कोणतेही परिवर्तन हे काळाच्या आश्रयाने घडते. काळ नेहमी पुढे जाणारा असतो. व्यावहारिक दृष्टीने काळाचे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असे ३ प्रकार होतात. जीव केवळ वर्तमानकाळ अनुभवू शकतो. भूतकाळाची केवळ स्मृती रहाते, तर भविष्यकाळाची केवळ कल्पना करता येते.
२. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचे महत्त्व
वास्तूशास्त्र हे दिशेशी (स्थळाशी) संबंधित शास्त्र आहे, तर ज्योतिष हे काळाशी संबंधित शास्त्र आहे.
२ अ. वास्तूशास्त्र : दिशा हा वास्तूशास्त्राचा आधार आहे. वास्तूशास्त्रात पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य या ८ दिशांचा विचार होतो. प्रत्येक दिशेकडून येणार्या सूक्ष्म ऊर्जेचे गुणधर्म निराळे असतात. वास्तूशास्त्रातील नियमांनुसार वास्तूची निर्मिती केल्यास नकारात्मक ऊर्जा अवरुद्ध होऊन वास्तूत सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. अशा वास्तूत सकारात्मक स्पंदनांचे गोलाकार भ्रमण होत रहाते. त्यामुळे वास्तूत रहाणार्या व्यक्तींना सुख, समृद्धी आणि शांती यांचा लाभ होतो. याउलट वास्तूशास्त्रातील नियमांना डावलून वास्तूची रचना केल्यास वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊन वास्तूत रहाणार्या व्यक्तींना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते.
२ आ. ज्योतिषशास्त्र : काळ हा ज्योतिषशास्त्राचा आधार आहे. आकाशात भ्रमण करणारे ग्रह हे काळाचे दर्शक आहेत. प्रत्येक जीव हा काळाशी बांधलेला आहे. जिवाच्या जन्माच्या वेळी आकाशात असलेली ग्रहस्थिती महत्त्वाची असून ती जिवाचे वर्तमान जन्मातील प्रारब्ध दर्शवते. जिवाच्या प्रारब्धानुसार त्याच्या जीवनात चांगल्या-वाईट घटना घडतात. ‘या घटना कधी घडतील ?’, हे ग्रहांच्या दशा (फळ देण्याचा कालावधी) आणि ग्रहांची गोचर (तात्कालीन) भ्रमणे यांवरून लक्षात येते.
२ आ १. ग्रहांचा परिणाम जिवावर कसा होतो ? : ग्रह हे मोठे ऊर्जास्रोत आहेत. प्रत्येक ग्रहाकडून त्याच्या गुणधर्मानुसार पंचतत्त्वात्मक (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश) सूक्ष्म ऊर्जा प्रक्षेपित होत असते. ग्रहांकडून येणारी ही ऊर्जा जिवाच्या अंतःकरणावर (मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांवर) परिणाम करते. जिवाच्या अंतःकरणात पूर्वजन्मांतील कर्मांचे संस्कार स्थित असतात. त्या संस्कारांवर विशिष्ट काळी ग्रहांच्या ऊर्जेचा परिणाम होऊन ते संस्कार फलोन्मुख होतात; परिणामी व्यक्तीच्या जीवनात चांगल्या-वाईट घटना घडतात. थोडक्यात ग्रह म्हणजे व्यक्तीच्या अंतःकरणातील प्रारब्ध-कर्मांचे संस्कार योग्य वेळी फलोन्मुख करण्याचे ईश्वरनियंत्रित माध्यम होय !
३. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र एकमेकांशी निगडित असणे
वास्तू आणि ज्योितष ही शास्त्रे एकमेकांशी जोडलेली आहेत. केवळ हीच नव्हे, तर सर्व भारतीय शास्त्रे एकमेकांशी जोडलेली आहेत; कारण त्यांची मूलतत्त्वे समान आहेत. अध्यात्म, योग, ज्योतिष, वास्तू, आयुर्वेद, संगीत आदी भारतीय शास्त्रांमध्ये पंचतत्त्वे (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश), त्रिगुण (सत्त्व, रज आणि तम), दिशा, काळ, कर्म, अंतःकरण, जीव, प्रकृती, ईश्वर आदींचा विचार केला गेला आहे. ‘जिवाला तामसिकतेकडून (अज्ञानाकडून) सात्त्विकतेकडे (ज्ञानाकडे) नेणे’, हे ध्येय समोर ठेवून भारतीय शास्त्रांची निर्मिती झाली आहे. सात्त्विकतेमध्ये स्थित जीव ईश्वराच्या निकट असतो.
३ अ. ग्रह आणि कुंडलीतील स्थाने यांचा दिशांशी असलेला संबंध : वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक दिशा एका ग्रहाशी संबंधित आहे, तर ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील प्रत्येक स्थान एका दिशेशी संबंधित आहे. प्रत्येक दिशेशी संबंधित ग्रह आणि दिशेशी संबंधित कुंडलीतील स्थाने यांची माहिती पुढील सारणीत दिली आहे.
वरील सारणीवरून लक्षात येते की, प्रत्येक दिशा एक ग्रहाशी आणि कुंडलीतील काही स्थानांशी संबंधित आहे, उदा. पूर्व दिशा ही सूर्याशी आणि कुंडलीतील प्रथम स्थानाशी संबंधित आहे. ‘पूर्व दिशा’, ‘सूर्य’ आणि ‘कुंडलीतील प्रथम स्थान’ हे तिन्ही घटक आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामुळे व्यक्तीच्या वास्तूत जर पूर्व दिशेत मोठा दोष असेल, तसेच तिच्या जन्मकुंडलीतही प्रथम स्थान आणि सूर्य हे अशुभ स्थितीत असतील, तर व्यक्तीला आरोग्याच्या गंभीर समस्या असतात.
४. व्यक्तीची वास्तू आणि तिच्या जन्मकुंडलीतील ग्रह हे व्यक्तीच्या प्रारब्धाचे दर्शक असणे
वास्तू आणि ग्रह हे व्यक्तीच्या प्रारब्धाशी जोडलेले असतात. व्यक्तीला तिच्या प्रारब्धानुसार वास्तू लाभते, तसेच व्यक्तीच्या जन्मकुंडलीत असणारे ग्रहयोग हे तिच्या प्रारब्धानुसार असतात. त्यामुळे व्यक्तीची वास्तू आणि जन्मकुंडलीतील ग्रह यांवरून तिच्या प्रारब्धाचा बोध होतो.
५. वास्तू ही समष्टी, तर जन्मकुंडली (ज्योतिष) ही व्यष्टी परिणाम दर्शवणारी साधने असणे
वास्तूमध्ये एकपेक्षा अधिक व्यक्ती निवास करतात. त्या दृष्टीने वास्तू ही समष्टी परिणाम करणारी आहे; मात्र त्या वास्तूत निवास करणार्या प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असते. त्या दृष्टीने ग्रह हे व्यष्टी परिणाम करणारे आहेत. वास्तूत असलेल्या दोषांचा परिणाम वास्तूत रहाणार्या सदस्यांवर एकसारखा होत नाही. याचे कारण म्हणजे वास्तू एक असली, तरी त्यात रहाणार्या प्रत्येक सदस्याचे व्यक्तीगत प्रारब्ध निराळे असते. त्यामुळे परिणामांत विविधता दिसून येते. वास्तूत दोष असल्यास आणि जन्मकुंडलीतील ग्रहसुद्धा दूषित असल्यास पुष्कळ वाईट परिणाम होतात, याउलट वास्तूत दोष नसल्यास आणि जन्मकुंडलीतील ग्रहसुद्धा शुभ स्थितीत असल्यास पुष्कळ शुभ परिणाम होतात.
६. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या दशांनुसार व्यक्तीवर वास्तूचा परिणाम होणे
वास्तूमध्ये असणार्या सर्व दोषांचा अशुभ परिणाम व्यक्तीवर एकाच वेळी होईल, असे नसते. व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार ज्या ग्रहाची दशा (फळ देण्याचा कालावधी) चालू असेल, त्या ग्रहांशी संबंधित दिशांमध्ये असलेल्या वास्तूदोषांचा परिणाम व्यक्तीवर त्या कालावधीत अधिक प्रमाणात होतो, उदा. व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार त्याची मंगळ ग्रहाची दशा चालू असेल, तर मंगळ ग्रहाशी संबंधित ‘दक्षिण’ दिशेत असणार्या वास्तूदोषाचा परिणाम व्यक्तीवर त्या कालावधीत अधिक प्रमाणात होतो.
७. दूषित वास्तू आणि जन्मकुंडलीतील दूषित ग्रह यांची स्पंदने सुधारण्यासाठी शास्त्रांमध्ये विविध उपाय सांगितलेले असणे
दूषित वास्तू आणि जन्मकुंडलीतील दूषित ग्रह यांची स्पंदने सुधारण्यासाठी वास्तू अन् ज्योतिष शास्त्रांमध्ये विविध उपाय सांगितले आहेत. दिशांची स्पंदने सुधारण्यासाठी वास्तूत रत्ने स्थापन करणे, यंत्रे स्थापन करणे, वृक्षारोपण करणे, बांधकामाच्या रचनेत पालट करणे इत्यादी उपाय केले जातात. ग्रहाची स्पंदने सुधारण्यासाठी (ग्रहाची शुभ ऊर्जा मिळण्यासाठी) संबंधित ग्रहाचा मंत्रजप करणे, शांतीविधी करणे, रत्न धारण करणे, दान करणे इत्यादी उपाय केले जातात. उपाय केल्याने अनिष्ट प्रारब्ध पूर्णपणे नष्ट होत नाही; पण दैवी ऊर्जा लाभून अनिष्ट परिणाम न्यून होतात.
सारांश, वास्तूशास्त्र हे स्थळाशी आणि ज्योतिषशास्त्र हे काळाशी संबंधित शास्त्र आहे. वास्तूशास्त्राद्वारे स्थळाची स्पंदने सुधारता येतात, तर ज्योतिषशास्त्राद्वारे काळाची स्पंदने सुधारता येतात. शुभ आणि मंगलमय स्पंदनांमुळे सुख-शांती प्राप्त होते, तसेच साधना करण्यास अनुकूल परिस्थिती लाभते. त्यामुळे जिवाचा भौतिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष साधण्यात वास्तू अन् ज्योतिष यांचे योगदान महत्त्वाचे आहे !’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.११.२०२४)