कुठलीही कृती सेवाभावाने परिपूर्ण केल्यास त्यातून आनंदप्राप्ती होत असल्याची फोंडा, गोवा येथील श्री. सुरेश नाईक यांना आलेली प्रचीती !

श्री. सुरेश नाईक

१. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा परिपूर्ण केल्यावर आनंद मिळणे

‘मी नोकरीत असतांना माझ्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवेचे दायित्व होते. ‘गुरुदेव माझ्याकडून ती सेवा परिपूर्ण करून घेतात’, असा भाव मी ठेवल्याने मला त्यातून होणारी आनंदप्राप्ती अवर्णनीय असायची.

२. नोकरीच्या ठिकाणीही परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न केल्यावर वेतन मिळाल्यावर होणार्‍या आनंदापेक्षा अधिक आनंद होणे

मी नोकरीतील कामकाजातही असेच करण्याचा प्रयत्न केला. ‘मला प्रतिमास मिळणार्‍या वेतनापेक्षाही हा आनंद अधिक आहे’, याची मला अनुभूती आली.

२ अ. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) शिकवणीचा आदर्श ठेवून एका ग्राहकाचे प्रलंबित काम २ दिवसांत पूर्ण करून देणे : मी ज्या कार्यालयात कार्यरत होतो, तेथे मी येण्याच्या आधीपासून एका ग्राहकाचे एक प्रकरण प्रलंबित होते. त्या ग्राहकाने मला त्या संदर्भात सांगितल्यानंतर आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वावरून ‘याने कसलेही गार्‍हाणे न करता केवळ हेलपाटे मारले आहेत’, असे मला जाणवले. तत्क्षणी ‘त्या ग्राहकाचे काम ‘परिपूर्ण सेवा’ हा भाव ठेवून करायचे’, असा विचार माझ्या मनात आला. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) शिकवणीचा आदर्श ठेवून मी त्या ग्राहकाचे काम २ दिवसांत पूर्ण केले.

२ आ. ग्राहकाचा अनुभवलेला कृतज्ञताभाव ! : काम पूर्ण झाल्याचा आनंद त्या ग्राहकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्याने आम्हाला चहा घेण्यासाठी येण्याची विनंती केली. आम्ही त्याला नम्रपणे नकार देऊन ‘तुमचे काम झाल्याचा आनंद अधिक आहे’, असे सांगितले. तेव्हा ‘ते काम करणे’, हे आमचे दायित्व असून त्यासाठी आम्हाला वेतन मिळते’, याची जाणीव प्रत्येकाला असावी’, असा विचार माझ्या मनात आला. ते ग्राहक परत गेल्यानंतर मी अन्य कामकाजात व्यस्त असतांनाच ते ग्राहक हातात चहाची किटली आणि ‘प्लॅस्टिक’चे पेले घेऊन आले. त्यांना त्याविषयी विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘‘चहावाला येथे येत नसल्याने मी स्वतःच चहा घेऊन आलो आहे.’’ त्याची भावना समजून घेऊन आम्ही सर्वांनी चहाचा प्रेमपूर्वक स्वीकार केला.

कार्यालयीन कामकाजातही प्रीती अनुभवायला दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या कोमल चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. सुरेश नाईक, ढवळी, फोंडा, गोवा. (२४.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक