निराशावादी नको, ध्येयवादी व्हा !

‘देवभूमी नर्सरी’ (चित्रावर क्लिक करा)

डेहराडून येथील सचिन कोठारी (वय ३३ वर्षे) वर्ष २००८ ते २०११ या काळात देहली येथे नोकरी करत होते. वेतनवाढ तर होत होती; पण मनाला समाधान मिळत नव्हते. केवळ आणि केवळ नोकरीचा ताण असायचा. ताणाला समवेत घेऊन चालू झालेली त्यांची सकाळ ही रात्री ताण घेऊनच संपत असे. ‘या सगळ्यात आपण काहीतरी गमावत आहोत’, असे कोठारी यांना वारंवार वाटायचे. शेवटी कंटाळून त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःची रोपवाटिका (नर्सरी) चालू केली. तिला ‘देवभूमी नर्सरी’ असे नाव दिले. वडील आणि मित्र यांच्याकडून काही रक्कम उसने स्वरूपात घेऊन वाटिकेच्या कामांना त्यांनी आरंभ केला. वर्ष २०१२ ते २०२२ या १० वर्षांच्या काळात त्यांना अनेक वाईट अनुभव आले; पण त्यांनी माघार न घेता त्यांची वाटचाल अशीच अखंड चालू ठेवली. कोणत्याही गोष्टीला प्रारंभ केल्यावर पदरी यश न येता अडचणींचा सामना करावाच लागतो. याचा प्रत्यय सचिन कोठारी यांनाही आला. पुष्कळ कष्ट करूनही झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे वाटिकेतील बरीचशी झाडे मरण पावली. व्यवसायात पुष्कळ हानी सोसावी लागली. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे भागीदार असणार्‍या सचिन यांच्या मित्राने त्या व्यवसायातून माघार घेतली; पण सचिन यांनी पराभव पत्करला नाही. त्यांनी चिकाटीने या संकटाचा सामना करण्याचे ठरवले.

डेहराडून येथील ‘देवभूमी नर्सरी’

कुटुंबियांनी या काळात त्यांना नोकरी करण्याविषयी पुनर्विचार करण्यास सांगितला; पण ते स्वतःच्या मतावर ठाम होते. रोपवाटिकेच्या व्यवसायात कार्यरत राहिले. या काळात त्यांनी अनेक तज्ञांच्या भेटी घेतल्या. बागकाम, तसेच रोपवाटिकेतील बारकावे शिकून घेतले. नवी भूमी भाड्याने घेऊन तेथे रोपवाटिका चालू केली. आज त्यांच्याकडे स्वतःची १५०० चौरस फूट भूमी आहे. त्यांच्या रोपवाटिकेत विविध फुलांचे २० प्रकार आहेत, तसेच ब्रोकोली, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर इत्यादी अनेक प्रकारची झाडेही आहेत. या सर्वांच्या विक्रीतून त्यांना प्रतिवर्षी ३० लाख रुपये इतके उत्पन्न मिळते. ‘माझ्याकडे आता धन, आरोग्य आणि मनःशांती आहे. त्यामुळे मी आनंदी आहे’, असे ते म्हणतात. सचिन यांनी घेतलेले कष्ट, त्यांची संयमी वृत्ती आणि चिकाटी निश्चितच कौतुकास्पद अन् सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘सचिन यांच्या कष्टाचे चीज झाले’, असे म्हणता येईल ! सचिन यांना त्यांच्या उत्कटतेचे फळ मिळाले. आजचा तरुण आधुनिकतेच्या जोरावर वाटचाल करत आहे; पण अशा स्थितीत सचिन यांनी समाधानाच्या शोधार्थ ‘कॉर्पोरेट’ जगतातील नोकरीचा त्याग करणे हा धाडसी निर्णय होता. आज प्रत्येक जण खेडेगावातून शहरात येत आहे. असे असतांना शहरातून खेडेगावात जाणार्‍या सचिन यांच्या कृतीला कदाचित् कुणी ‘मागासलेपणा’ म्हणू शकतो; पण सचिन यांनी जे पाऊल उचलले, ते अभिमानास्पद आहे.

डेहराडून येथील ‘देवभूमी नर्सरी’चे श्री. सचिन कोठारी

संयमाच्या अभावाचा परिणाम !

सध्याची परिस्थिती पाहिली, तर तरुणाईमधील संयमच संपत चालला आहे. चिकाटी, संवेदनशीलता हे संपण्याच्याच मार्गावर आहे. त्यामुळे ‘कष्ट’, ‘परिश्रम’ या शब्दांचे मोल त्यांना काय समजणार ? ‘४  भिंतींच्या आत वातानुकूलित कार्यालयात बसून काम करणे’, याला तुलनेत ‘कष्ट’ म्हणत नाहीत. कष्टाचे मोल समजून घेण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते. अनेक अडचणींवर मात करावी लागते; पण आज हे क्वचितच आढळून येते. याला कारणीभूत असणारी आजच्या तरुण पिढीची धरसोड वृत्ती ! ही वृत्ती सर्वच ठिकाणी दिसून येते, मग ते शाळा-महाविद्यालय असो, संसार किंवा नोकरी असो. ‘आज हे जमले नाही, तर सोडून देऊ’, ‘परीक्षेत अनुत्तीर्ण झालो की, केली आत्महत्या’, ‘पती-पत्नीचे पटले नाही की, झाले विभक्त’, अशाच स्वरूपाची मानसिकता सर्वत्र आढळून येते. ‘काय आणि कसे प्रयत्न करू, म्हणजे मी अमुक गोष्टीत यशस्वी होईन ?’, असा विचारही कुणी करत नाही. मग कसे मिळणार यश ? पदरी येणार ती केवळ आणि केवळ निराशा ! विचारांचे हे दुष्टचक्र न संपणारेच आहे. झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यावर सचिन यांनी जर हातातील सर्व सोडून पुन्हा नोकरी करण्याचे ठरवले असते, तर ते आयुष्यात कधी यशस्वी झाले असते का ? प्रयत्नांमधील आनंद त्यांना मिळाला असता का ? नाही. यशाच्या वाटचालीत अडचणी येतातच; पण त्यांच्यासमोर हात-पाय गाळून न बसता निग्रहाने त्यांचा सामना करायला हवा. आशावादी माणूसच प्रगती साध्य करू शकतो. ‘१ + १ म्हणजे २ नव्हे, तर ११’ असे गणित मनात बाळगणाराच यशस्वी होऊ शकतो. या सर्वांचा अवलंब केल्यानेच सचिन यांना भरभराट प्राप्त झाली.

आनंदप्राप्ती : काळाची आवश्यकता !

आज प्रत्येकाचे आयुष्य हे पैशांच्या भोवतीच फिरत आहे. जो तो पैसा, प्रगती, नोकरी यांच्या मागे पळत आहे. इकडे तिकडे बघायलाही कुणाकडे वेळ नाही. विकासाकडे वाटचाल करत असतांनाच ‘खरेखुरे समाधान, शांती आणि आनंद यांना मात्र आपण मागे सोडून चाललेलो आहोत’, याची यत्किंचित् जाणीवही कुणाला होत नाही. मानवाला आनंदापेक्षा ‘पैसा’च अधिक मौल्यवान वाटू लागला आहे. जिथे पैशांची लालसा आहे, हाव आहे, तिथे शांती-समाधान टिकेल का ? निश्चितच नाही ! तंत्रज्ञान विकासाचे सुख देईल; पण ‘आनंद’ देऊ शकणार नाही. आजच्या काळात आनंद मिळवणे महत्त्वाचे आहे. निराशेच्या जगतात वावरणार्‍या आजच्या तरुणाईसाठी ती काळाची आवश्यकता आहे. आनंदच मनुष्याच्या आयुष्यात परिवर्तन घडवतो. सचिन यांचे उदाहरण पहाता निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना पुष्कळ आनंद मिळाला. निसर्ग आनंद देतोच; पण केवळ निसर्ग हेच आनंद मिळवण्याचे एकमेव माध्यम आहे, असे नाही. ईश्वराची आराधना करणे, तसेच धर्माचरण करणे यांतूनही आनंद मिळू शकतो. यासाठी साधनेची कास धरा. चिकाटी, संयम, परिश्रम, आत्मविश्वास आणि ईश्वरनिष्ठा ही यशाची पंचसूत्री जोपासून आयुष्यात यशस्वी व्हा !

अडचणींसमोर हात-पाय गाळून न बसता त्यांचा निग्रहाने सामना करून आयुष्यात यश मिळवा !