सातारा, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या सहनियंत्रणाखाली १ लाख लिटर क्षमतेची सार्वजनिक पाण्याची टाकी होती. ही पाण्याची टाकी संबंधित विभागाची किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयाची अनुमती न घेताच पाडण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजयकुमार बाचल यांनी समक्ष उपस्थित राहून ही तक्रार दिली होती.
बाचल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुमठे येथील पाण्याची टाकी पाडल्याविषयी संतोष चव्हाण यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्यात आली, तसेच स्थानिक स्तरावरही स्थळ पहाणी करण्यात आली. या वेळी टाकी पाडल्यानंतर त्याचे कोणत्याही प्रकारचे लोखंडी साहित्य आढळून आले नाही. तसा अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी दिला होता. त्यानुसार गटविकास अधिकारी तथा पंचायत समिती प्रशासक यांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. एकूणच शासकीय मालमत्तेची हानी झाल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसात तक्रार करत आली आहे.
संपादकीय भूमिकामनमानी कारभार करणार्या प्रशासकीय अधिकार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी. यांनी असे अजून कुठे निर्णय घेतले आहेत, हेही अभ्यासायला हवे. अन्यत्र कुठे असे होत नाही ना ? हेही प्रशासनाने पहावे ! |