नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे ! – जितेंद्र पाटील, अपर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य

 नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे ! – जितेंद्र पाटील

सातारा, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – वाहतुकीसाठी असणार्‍या नियमांचे पालन नागरिकांकडून होत नाही. अजूनही शिरस्त्राण न घालणे, ‘सीट बेल्ट’ न बांधणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे असे प्रकार चालूच आहेत. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.

येथील ‘श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यान’ येथे रस्ते अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींसाठी पाळण्यात येणार्‍या ‘जागतिक स्मरणदिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.

या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण म्हणाले की, ज्या चुकांमुळे अपघात घडला आहे, त्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अपघात ही मानवनिर्मित आपत्ती असून यामुळे संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवित यांची हानी होते. अपघात होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे म्हणजे कुटुंब आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे.