बंगालमध्ये एका शाळेत हिजाब आणि भगवे वस्त्र यांवरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी !

हावडा – बंगालमधील हावडा येथील एका शाळेत विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिजाब आणि ‘नमाबली’ (देवतांचे नाम असलेले भगवे वस्त्र) यांवरून हाणामारी झाली. विद्यार्थ्यांचा एक गट गळ्यात ‘नमाबली’ घालून वर्गात जाण्याची अनुमती मागत होता. ‘जर मुलींना हिजाब घालून वर्गात प्रवेश मिळू शकतो, तर आम्हाला ‘नमाबली’ घालून का नाही ?’, असा प्रश्‍न या गटाने उपस्थित केला. यावरून दोन गटांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या सैनिक यांना तैनात करण्यात आले. यामुळे शाळेच्या अधिकार्‍यांना बोर्डाची पूर्वपरीक्षा रहित करावी लागली.

शाळेच्या गणवेशात ‘भगवा स्कार्फ’ घातलेले ५ विद्यार्थी शाळेच्या गेटवर जमल्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यांनी आत प्रवेश देण्याची मागणी केली. शाळेच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या सूत्रावरून विद्यार्थ्यांमध्ये हिजाब समर्थक आणि ‘नमाबली’ समर्थक असे दोन गट पडले. शिक्षकांना विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.