गोसंवर्धन आयोगाची स्थापना आणि संस्कृत शाळा चालू करा !

  • वारकरी संप्रदायाची राज्यव्यापी ‘हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी महाअधिवेशना’त एकमुखी मागणी
  • हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार !
व्यासपिठावर उपस्थित संत, महंत आणि वारकरी

आळंदी (जिल्हा पुणे), २१ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करावी, तसेच संस्कृत शाळा चालू कराव्यात, अशी एकमुखी मागणी समस्त वारकर्‍यांनी येथे पार पडलेल्या राज्यव्यापी ‘हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी महाअधिवेशना’त केली. या वेळी वारकर्‍यांनी हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचाही निर्धार केला.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २१ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेले हे महाअधिवेशन उत्साही वातावरणात पार पडले. आळंदीतील गोपाळपुरा येथील श्री देविदास धर्मशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृतीमंदिर येथे या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या महाअधिवेशनाचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. या अधिवेशनास संत, महंत, वारकरी आदी उपस्थित होते.

महाअधिवेशनाचा प्रारंभ संत आणि महंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या वेळी देशात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ यांच्या विरोधात कायदा करावा, गोवंश हत्याबंदी कायदा करावा, महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करावा आदी राष्ट्र अन् धर्म हितैषी मागण्या ठरावाद्वारे करण्यात आल्या. यांसह धर्मावरील वाढते आघात पहाता भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशीही जोरदार मागणी करण्यात आली.

(याविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)