१. रुग्णाईत झाल्यामुळे आश्रमातून घरी रहायला गेल्यावरही सहसाधकांनी विचारपूस करून नामजपादी उपाय करायला सांगून काळजी घेणे
‘२५.१.२०२१ ते १५.२.२०२१ या कालावधीत मी रुग्णाईत झाल्यामुळे आश्रमातून घरी रहायला गेले होते. दुसर्या दिवशी कु. अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी मला संपर्क करून नामजपादी उपाय सांगून ते करायला सांगितले. आश्रमातील वैद्यांनीही औषधोपचारांविषयी विचारपूस केली.
सौ. गायत्री शास्त्री यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘ताई, मला तुमच्या नामजपादी उपायांचा आढावा घ्यायला सांगितला आहे.’’ या सर्व गोष्टींमुळे ‘मी घरी आले असतांनाही साधक माझी किती प्रेमाने काळजी घेत आहेत, मी त्यात किती अल्प पडते’, याची मला जाणीव झाली. मला गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.
२. रुग्णाईत असतांना स्वभावदोष आणि अहं न्यून होणे
माझा स्वभाव पुष्कळ भित्रा असल्याने पूर्वी मला ‘मी रुग्णाईत झाले, तर काय होणार ?’, अशी भीती वाटायची; परंतु या वेळी देवाच्या कृपेने माझ्या मनात विचार आला, ‘प्रारब्धात आहे, ते होणारच आहे. गुरुकृपेने ते आनंदाने भोगले, तर माझी साधना होणार आहे.’ या कालावधीत माझ्यातील ‘परिस्थिती न स्वीकारणे, कुटुंबियांकडून अपेक्षा करणे, अधिकार गाजवणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे’, असे स्वभावदोष आणि अहं न्यून होण्यास साहाय्य झाले. या कालावधीत मला देवाने परिस्थिती स्वीकारायला शिकवले आणि माझी आवड-निवड नष्ट केली.
३. देवाने कुटुंबियांकडून असलेल्या अपेक्षा न्यून केल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कुटुंबीय यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे
माझा मुलगा कामाला जातांना स्वयंपाक करून जायचा आणि रात्री ९ वाजता घरी आल्यावर स्वयंपाक करायचा. त्यामुळे मला त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागले. पूर्वी मला उशिरा जेवल्यावर त्रास होत होता. या वेळी तसा त्रास झाला नाही. तो ‘माझ्यासाठी फळे आणून आणि आवश्यक ते सर्व करून ठेवून कामाला जायचा. देवाने माझ्या कुटुंबियांकडून असलेल्या अपेक्षा न्यून करून घेऊन मला शांत आणि स्थिर ठेवले. ‘स्वतःमध्ये पालट केल्यावर इतरांमध्येही न सांगता पालट होतो’, हे देवाच्या कृपेने मला शिकायला मिळाले. या सर्व प्रसंगांतून माझी कुटुंबीय आणि गुरुदेव यांच्याप्रती कृतज्ञता वाढत गेली.
४. रुग्णाईत असतांनाही देवाने व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेऊन सत्सेवेत ठेवणे
प्रथम २ दिवस मला पुष्कळ बरे वाटत नव्हते, तेव्हा केवळ झोपून रहावे लागले; परंतु त्या वेळीही ‘अनुसंधानात रहाणे, नामजप करणे, गुरुदेवांच्या चरणपादुकांचे स्मरण करणे, गुरुदेवांशी बोलणे, अधूनमधून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी सूक्ष्मातून बोलणे’, असे प्रयत्न केले. त्यामुळे मला लवकर बरे वाटले. मी रुग्णाईत असतांनाही देवाने मला सतत सत्सेवेत ठेवले. ‘ऑनलाईन सत्संग, शिबिरे आणि संगणकीय सेवा’, अशा सेवा देवाने मला उपलब्ध करून दिल्या अन् त्या माझ्याकडून करूनही घेतल्या. प्रतिदिन सद्गुरु स्वाती खाडये व्यष्टी आढावा घेत होत्या. त्यामुळे चैतन्य आणि ऊर्जा मिळून दिवसभर उत्साह वाटायचा. देवाच्या कृपेने मला प्रतिदिन सकाळी ६.३० वाजता साधकांचे व्यष्टी आढावे घेण्याची सेवा मिळाली होती.
कृतज्ञता
गुरुदेवांची प्रीती, कुटुंबीय आणि साधक यांनी दिलेले प्रेम यांमुळे रुग्णाईत असतांनाही देवाने साधना करण्यासाठी संधी देऊन ती करून घेतली. त्यामुळे मन पुष्कळ स्थिर आणि शांत राहिले. प्रसंगांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. रुग्णाईत असतांनाचे २५ दिवस कसे गेले, ते मला कळलेही नाही. गुरुदेवांनी केलेल्या या कृपेसाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. मीनाक्षी धुमाळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), म्हापसा, गोवा. (९.३.२०२१)
|