छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ५ वेळा माफीचे पत्र पाठवले ! – सुधांशू त्रिवेदी, प्रवक्ते, भाजप  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मागितलेल्या माफीनाम्याविषयी स्पष्टीकरण देतांना केलेले विधान

सुधांशू त्रिवेदी

नवी देहली – छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ५ वेळा माफीचे पत्र पाठवले, असे विधान भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी येथे केले.

काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याविषयी बोलतांना त्रिवेदी म्हणाले की, सावरकरांच्या काळात अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला अशी ५ पत्रे पाठवली होती.

ही भाजपची भूमिका आहे का ? – खासदार संजय राऊत

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘भाजपची हीच भूमिका आहे का?, हे भाजपने स्पष्ट करावे आणि ती नसेल, तर सदर प्रवक्त्यावर कारवाई करावी. भाजपचे प्रवक्ते शिवरायांचा अपमान करत असतील, तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे ?’’

संपादकीय भूमिका

छत्रपतींनी मागितलेली माफी ही शत्रूला चकवा देण्यासाठी राबवलेल्या कूटनीतीचा भाग होता. त्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजांना पाठवलेले माफीपत्र, हाही कूटनीतीचा भाग होता. त्यांना कारागृहात खितपत पडण्यापेक्षा बाहेर येऊन देशसेवा करण्याच्या उदात्त हेतूने हे पत्र पाठवले होते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या प्रकारे जीवन व्यतित केले, त्यावरून हे स्पष्ट होते. सावरकरद्वेष्टे जाणूनबुजून या सूत्राचे भांडवल करतात, हे लक्षात घ्या !