काशी विश्‍वनाथ मुक्तीचा संघर्ष हा आध्यात्मिक उर्जेला प्रवाहित करण्यासाठी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी येथे उत्तर भारतस्तरीय २ दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन

डावीकडून सद्गुुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, दीपप्रज्वलन करतांना स्वामी वेदतत्त्वानंद पुरी आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ

काशी – काशी आध्यात्मिक नगरी असून आपल्या उर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे आपल्याला भौतिक नाही, तर आध्यात्मिक विकास हवा आहे. काशी विश्‍वनाथ मुक्तीचा हा संघर्ष या आध्यात्मिक उर्जेला प्रवाहित करण्यासाठी आहे. वर्ष १९४७ नंतर काश्मीरमध्ये जेवढी मंदिरे तोडण्यात आली, त्यांना पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काशी ज्ञानवापी मुक्तीसाठी कार्यरत सर्वोच्च न्यायालयाचे धर्माभिमानी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कालकाजी येथील लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये (सनातन धर्म मंदिरमध्ये) उत्तर भारत स्तरीय २ दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करत होते.

स्वामी वेदतत्त्वानंद पुरी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक संत सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला प्रारंभ झाला. या अधिवेशनामध्ये उत्तरदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, देहली, राजस्थान आणि मध्यप्रदेश या ८ राज्यांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, मंदिर विश्‍वस्त, अधिवक्ता, विचारवंत आदी सहभागी झाले होते.

भारतासह अन्य देशांनाही हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक ! – स्वामी वेदतत्त्वानंद

एकेकाळी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हिंदु भूमी होती. गेल्या ७०० वर्षांमध्ये हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे झाली. या आक्रमणांमध्ये अन्य ठिकाणच्या संस्कृती नष्ट झाल्या; पण सनातन धर्म नष्ट झाला नाही. सद्यःस्थिती पहाता आपल्याला जागृत होऊन भारतासह अन्य देशांनाही हिंदु राष्ट्र बनवण्याचा विचार केला पाहिजे.

हिंदु राष्ट्राची स्थापना ही धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्ध ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज आम्ही वायू, ध्वनी आदी प्रदूषणाच्या गोष्टी करतो; पण राष्ट्र आणि धर्म विरोधी वैचारिक प्रदूषणाकडे लक्ष कधी देणार ? हिंदु राष्ट्राची स्थापना हे धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्ध आहे. सरकार कोणत्याही विचारसरणीचे असो; देशाची राज्यव्यवस्था ही देशाचे बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाच्या दृष्टीने अनुकूल असली पाहिजे. म्हणून आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल.

काश्मिरी हिंदूंना काश्मीरचे निवासी असल्याचे ‘मूळनिवासी प्रमाणपत्र’ मिळवणे कठीण ! – श्री. सुशील पंडित, ‘रुट्स इन काश्मीर’

ज्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव मुठीत घेऊन विस्थापित व्हावे लागले, जे ३० वर्षांपासून त्यांच्या मातृभूमी काश्मीरमध्ये परत जाऊ शकले नाहीत, त्यांना ‘मूळनिवासी प्रमाणपत्र’च्या नावाने काश्मीरचे निवासी असल्याचे १५ वर्षे जुनी प्रमाणपत्रे मागितली जात आहेत.

‘यु.पी.एस्.सी.’ कोचिंग संस्थांमध्ये हिंदुविरोधी शिक्षण ! – श्री. नीरज अत्री, विवेकानंद कार्य समिती  

आज ‘यु.पी.एस्.सी.’ (केंद्रीय लोक सेवा आयोग) कोचिंग संस्थांमध्ये हिंदुविरोधी कार्य चालू आहे. या संस्थांमध्ये रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांतील कथा विकृत स्वरूपात शिकवल्या जात आहेत. सनातन धर्मावर टीका करण्याचे धाडस त्यांच्यात कुठून येत आहे ?