इराणमध्ये आंदोलकांनी पेटवले दिवंगत सर्वोच्च धर्मगुरूचे घर !

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चालूच !

(हिजाब म्हणजे मुसलमान स्त्रियांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

तेहरान (इराण) – येथे हिजाबच्या सक्तीवरून पेटलेले आंदोलन आता आणखी चिघळले आहे. इराणला कट्टर इस्लामी बनवणारे दिवंगत सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खोमेनी यांचे खोमेन शहरातील जन्मघर आंदोलकांनी पेटवून दिले. याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. खोमेनी यांच्या निधनानंतर तेथे वस्तूसंग्रहालय बांधण्यात आले होते. वरील घटनेच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओत आंदोलकांचा एक जमाव खोमेनी यांच्या घरावर चाल करून जातांना आणि नंतर त्यांच्या घराची तोडफोड करून हे घर पेटवून देत अल्याचे दिसत आहे. इराण सरकारने मात्र अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.
हिजाबसक्ती असलेल्या इराणमधील महासा आमीन या तरुणीने हिजाब नीट न घातल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत असतांना तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून (अनुमाने ३ मासांपासून) इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाचा भडका उडाला असून या आंदोलनात महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच मागील आठवड्यात अटक केलेल्या एका आंदोलकाला इराणने मृत्यूदंड ठोठावला. त्यामुळे आंदोलकांच्या रागात आणखीच भर पडली.

संपादकीय भूमिका

धार्मिक कट्टरतेमुळे जेव्हा समाजावर बंधने लादली जातात, तेव्हा सरकारच्या जाचाला कंटाळून समाजात अशा प्रकारचा उद्रेक होतो ! त्यामुळे भविष्यात अन्य इस्लामी देशांतही लोकांचा अशा प्रकारे उद्रेक झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !