प्रतापगडावर भावी पिढीला प्रेरणा देणारा शिवरायांचा इतिहास उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

मुंबई – वर्ष २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील. यासाठी ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

राज्यातील गडदुर्गांच्या विकासाविषयी १६ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयात पर्यटनमंत्री लोढा यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांसह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘प्रतापगडासह राज्यातील अन्य गड आणि दुर्ग यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रायगड विकास प्राधिकरणाद्वारे रायगड परिसरात चालू असलेल्या विकासकामांसाठी पर्यटन विभाग साहाय्य करेल. राज्यातील सागरतटीय क्षेत्रातील गडदुर्गांच्या विकासासाठी शासन आग्रही आहे.’’

रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारणार ! – छत्रपती संभाजीराजे, अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण

रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे ८८ एकर जागा रायगड प्राधिकरणाने संपादित केली आहे. येथे शिवसृष्टी, मराठा संशोधन केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, अत्याधुनिक संग्रहालय यांची उभारणी होणार आहे. याविषयी पर्यटन विकास महामंडळासमवेत सामंजस्य करार झाला आहे.