‘मागणी तसा पुरवठा’ यावर आधारित शेतीत निश्चित यश मिळते ! – प्रकाश आवाडे, आमदार

ब्राह्मण शेतकरी मेळावा

ब्राह्मण शेतकरी मेळाव्यात बोलतांना आमदार प्रकाश आवाडे, तसेच मान्यवर

कोल्हापूर – पिकांना हवे असलेले खत, पाणी, कीटकनाशके यांचा संतुलित वापर करून मातीची सुपीकता टिकवून पिकांचा पोत समजून घेतला पाहिजे. शेतीमध्ये नवे प्रयोग होत नाहीत. एखाद्याने केलेला प्रयोग यशस्वी झाल्यावर इतर शेतकरी त्याचे अनुकरण करतात; पण पहिला प्रयोग करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामुळेच काळानुरूप ‘मागणी तसा पुरवठा’, यावर आधारित शेती केल्यास निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार श्री. प्रकाश आवाडे यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी, ‘नेचर केअर फर्टिलायझर विटा’ (जिल्हा सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे विश्वपंढरी सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शेतकरी आघाडीचे अध्यक्ष श्री. गोपाळ कुलकर्णी होते. मेळाव्याचे उद्घाटन ‘श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी, श्री. गोपाळ कुलकर्णी, श्री. जयदेव बर्वे आणि अन्य मान्यवर यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत आणि प्रास्ताविक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. शाम जोशी यांनी केले. या प्रसंगी विविध ठराव करण्यात आले.