परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर शस्त्रक्रियेसारख्या गंभीर प्रसंगाला सामोरे जाणारे पुणे येथील दांपत्य श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक स्तर ६९ टक्के) आणि सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक स्तर ६६ टक्के)!

‘२९.९.२०२१ या दिवशी रात्री माझे यजमान श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक स्तर ६९ टक्के) यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास होऊन रात्रभर उलट्या झाल्या. आधुनिक वैद्यांकडे जाऊन केलेल्या तपासणीनंतर ‘यजमानांच्या पोटात पुष्कळ मोठे ‘अंतर्गळ’ (हर्निया) असून त्यांच्या पोटातील लहान आतडे बरेच खाली घसरले आहे’, असे लक्षात आले. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी त्वरित पोटाचे शस्त्रकर्म करावे लागणार असल्याचे सांगितले. शस्त्रकर्म करण्यापूर्वी आणि नंतर यजमानांना अन् मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. अरविंद सहस्रबुद्धे

१. शस्त्रकर्म कठीण असतांनाही यजमानांनी स्थिर राहून सतत नामजप आणि प्रार्थना करत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे

सौ. मंगला सहस्रबुद्धे

शस्त्रकर्मासाठी यजमानांना रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘‘त्यांचे वय ७६ वर्षे आहे आणि त्यांना मधुमेह अन् रक्तदाब यांचा त्रास असल्याने शस्त्रकर्म कठीण आहे, तरी आम्ही प्रयत्न करू’’, असे सांगितले. हे सर्व ऐकूनही यजमान स्थिर राहून सतत नामजप आणि प्रार्थना करत गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करत होते.

२. यजमानांच्या शस्त्रकर्माच्या वेळी संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे

सर्व वैद्यकीय चाचण्या झाल्यावर १.१०.२०२१ या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता शस्त्रकर्म करण्याचे निश्चित झाले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु सत्यवान कदम यांनी आम्हाला नामजपादी उपाय सांगितले. यजमानांच्या शस्त्रकर्माच्या कालावधीत मी (सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे) तो नामजप करत होते.

३. घडत असलेल्या सर्व प्रसंगांचा संपूर्ण भार परात्पर गुरु डॉक्टरांवर सोपवून शांत आणि स्थिर रहाता येणे

शस्त्रकर्माच्या वेळी यजमानांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे शस्त्रकर्म जवळजवळ ३ घंटे चालू होते. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘‘त्यांना रात्रभर अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल’’, असे आम्हाला सांगितले. हे सर्व प्रसंग घडत असतांना त्यांचा संपूर्ण भार गुरुदेवांवर सोपवून त्यांच्याच कृपेने मी शांत आणि स्थिर राहू शकले.

४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मोठे शस्त्रकर्म यशस्वी होऊन अल्प कालावधीतच यजमानांना बरे वाटणे

शस्त्रकर्माच्या दुसर्‍या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने यजमानांचा रक्तदाब सामान्य स्थितीला आला. तिसर्‍या दिवशी त्यांना घरी सोडले. शस्त्रकर्म मोठे असल्याने पोटाला २५ टाके पडले होते. ‘मधुमेहाचा त्रास असल्याने एकाच वेळी सर्व टाके काढता येणार नाहीत’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते; मात्र सातव्या दिवशी त्यांच्याकडे गेल्यावर सर्व टाके सुकल्याचे दिसले. याचे आधुनिक वैद्यांनाही नवल वाटले. ही सर्व किमया केवळ गुरुदेवच करू शकतात.

हळूहळू सर्व काळजी घेऊन नोव्हेंबर मासाच्या अखेरीस यजमान पूर्ण बरे झाले. एवढा मोठा जिवावरचा प्रसंग केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेने दूर झाला. आता यजमान साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा पूर्वीप्रमाणे करत आहेत.

गुरुदेवांनी आम्हा पती-पत्नीला या प्रसंगातून तारले. ‘गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून सतत त्यांच्या अनुसंधानात राहिल्यावर तेच काळजी घेतात’, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले. ‘गुरुदेव सतत आमच्या समवेत आहेत’, असे आम्हाला जाणवते. ‘इतके महान गुरुदेव आमच्या जीवनात आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करता येत आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, आपल्या चरणी शब्दातीत कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक स्तर ६६ टक्के), पुणे (८.४.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक