श्री गणेशाची भक्ती करणारे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे !

आज १६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘थोरले माधवराव पेशवे स्मृतीदिन’ आहे. त्या निमित्ताने…

थोरले माधवराव पेशवे

‘कार्तिक कृष्ण अष्टमीला श्रीमंत माधवराव पेशवे यांचा ‘थेऊर’ (पुणे) या गावी अंत झाला आणि त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी रमाबाई सती गेल्या.

अल्पावधीत माधवराव पेशवे यांना जिवापाड श्रम करावे लागले. त्यामुळे पूर्वीपासून  नाजूक असलेल्या त्यांच्या प्रकृतीवर विलक्षण ताण पडला. अखेरच्या कर्नाटकच्या स्वारीत त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. अंगी रुजत असलेला क्षयरोग हळूहळू वाढीस लागला. भारतातील प्रसिद्ध वैद्य महिधर गंगा विष्णु यांचे औषध चालू झाले. हवापालटासाठी आणि गजाननावरील भक्तीमुळे श्रीमंतांचा मुक्काम थेऊरला होता. कार्तिक मासात प्रकृती आणखी बिघडली. ते थेऊरच्या मंदिराच्या आवारात येऊन राहिले. श्री गणपतीस जलाची संतत धार धरली, तसेच ज्वरशांती आणि अनुष्ठान केले. दानधर्म पुष्कळ करवला. माधवरावांनी कार्तिक शुक्ल षष्ठीला सौ. रमाबाई यांना सहगमनाविषयी बोध केला. त्या वेळी त्यांनी उत्तर दिले, ‘‘ईश्वरसत्ता प्रमाण.’’ अचानक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हवा दूषित झाली. सर्वांगावर सूज आली. रमाबाई केवळ गोमूत्र आणि दूध यांवर ५-७ दिवस राहिल्या. कार्तिक कृष्ण तृतीयेला रमाबाईंनी सती जाण्याच्या वेळी नेसावयाची पातळे (साड्या) आणावयास सेवकाला पुण्यास पाठवले. माधवरावांची अखेरची वेळ आली. ‘‘आम्ही महायात्रेस जातो. स्वारीची सिद्धता करा’’, असे श्रीमंत बोलू लागले. त्यांची स्मृति अखेरच्या क्षणापर्यंत होती. बुधवार, कार्तिक कृष्ण अष्टमीला ‘गजानन, गजानन’, असे म्हणत मोठ्या योग्याप्रमाणे नेत्रांद्वारे प्राण गेला. प्रजेचे छत्र गेले. मोठा घात झाला. रमाबाईसाहेबांनी तरुणपणात स्त्री धर्माची शर्थ केली. सर्व दागदागिने स्वहस्ते सर्वांना वाटले. नंतर त्या सती गेल्या.’

(साभार : दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))