तिने प्रेम केले, त्याने गळा कापला !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशातील वातावरण तापले आहे. निर्भयावर अत्याचार झाल्यानंतर जितक्या मोकळेपणाने प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी, स्त्री-स्वातंत्र्यवाले व्यक्त होत होते, तेवढे आता अत्यंत सावधपणे बोलले जात आहे. वास्तविक श्रद्धा वालकरच्या हत्येची दाहकता अधिक आहे. पुरोगाम्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘प्रेमाला धर्म नसतो’, हे वाक्य ती शब्दशः जगली होती. आफताबसमवेतच्या प्रेमप्रकरणाला कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे तिने कुटुंबियांशी संबंधही तोडले होते. विवाहापूर्वीच ती त्याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहून स्वातंत्र्यही उपभोगत होती. असे असूनही प्रियकर असलेल्या आफताब याला ‘लग्न कर’ म्हणून मागे लागल्यामुळे श्रद्धाला जीव गमवावा लागला आहे. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये भरून ठेवणे, ही तर क्रौर्याची परिसीमाच झाली. सामान्य पापभिरू माणूस इतरांना साधा धक्का लागला, तर दिलगिरी व्यक्त करतो. स्वतःच्या प्रेमिकेचा गळा दाबून तिची हत्या करण्याची, तिच्या मृतदेहाचे जनावरांप्रमाणे तुकडे करण्याची आणि त्याही पुढे जाऊन ते तुकडे घरातील फ्रिजमध्ये भरून ठेवण्याइतकी मग्रुरी आफताबने दाखवली आहे. रात्री मृतदेहाचा १-१ तुकडा घेऊन जंगलात टाकून येतांना आफताबला काहीच वाटले नाही ? मागच्याच आठवड्यात पत्रकार महिलेला कपाळाला कुंकू लावण्याचा सल्ला दिला; म्हणून पू. भिडेगुरुजी यांच्यासारख्या राष्ट्रभक्त विभूतीला टीकेचे लक्ष्य बनवणारे ‘आफताबला हिंदु मुलींच्या देहाचे ३५ तुकडे करून जंगलातील प्राण्यांना खायला घालण्याचा अधिकार आहे’, असे समजतात का ? लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे भवितव्य किती अंधकारमय असते, याविषयी धर्मप्रेमी संघटना समाजात जागृती करत असतांना त्यांची खिल्ली उडवून ‘कट्टरतावादी’ म्हणून हिणवणार्‍यांना श्रद्धाचे तिच्या मुसलमान प्रियकराने जे केले, ते पुरोगामी विचारांचे लक्षण वाटते का ? लिव्ह इन रिलेशनशीप अनैतिक आहे; म्हणून इतरांना सावध करणार्‍यांना बुरसटलेले म्हणणार्‍यांना त्यातील हे धोके अजून किती युवतींचा बळी गेल्यानंतर लक्षात येणार आहेत ?

आफताबला विरोध का नाही ?

मतभेद असू शकतात. आधी प्रेम केले; पण नंतर पुढे जायचे नाही, तर विभक्तही होता येते. लग्नासाठी मागे लागते; म्हणून तिचा शांत डोक्याने नियोजनपूर्वक गळा दाबून मृतदेहाचे ३५ तुकडे करण्याला जिहाद का म्हणायचे नाही ? कुंकू लावण्याच्या विधानावरून पू. भिडेगुरुजी यांना नोटीस पाठवणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आता वसईच्या मुलीच्या देहाच्या विटंबनेच्या प्रकरणी गप्प का आहेत ? देशात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत आणि त्यात अडकलेल्या महिलांची सुरक्षा किती धोकादायक पातळीवर आहे, हेच यातून दिसून येते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा असता, तर कदाचित् श्रद्धा वालकरचा जीव वाचला असता; पण या विषयावर कुणीच कोणतीच चर्चा उघडपणे करणार नाही; कारण तो आफताब आहे आणि जी जिवानिशी गेली, ती श्रद्धा आहे. सामान्य हिंदु मुलीच्या जिवाचे मोल पत्रकार महिलेच्या कपाळावरील कुंकवापेक्षा हलकेच आहे. वास्तविक महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्या देशात एकापेक्षा एक सक्षम कायदे आहेत. सामाजिक स्तरावर जागृतीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या सगळ्या वातावरणात श्रद्धाची झालेली हत्या हा प्रेमाचा रंग नाकारणार्‍यांच्या अतीशहाणपणापोटी गेला आहे. आतापर्यंत सहस्रो मुसलमानांनी सहस्रो युवतींचा उपभोग घेऊन आणि नंतर वार्‍यावर सोडून दिल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडत असतांना घरच्यांनाच ‘तुमची मुलगी मेली समजा’, असे सांगणार्‍या श्रद्धा वालकरने एका धर्मांध व्यक्तीवर अतीविश्वास ठेवला. त्याच्या समवेत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहाण्याचा अत्यंत धोकादायक मार्ग पत्करला. तिच्या हत्येमुळे आफताबसाठी त्यांच्या स्वर्गाचा दरवाजा उघडला असेल; पण श्रद्धा आणि तिची कुटुंबीय यांना नरकयातना भोगाव्या लागत आहे, याचे वैषम्य बाकी समाजाने वाटून घ्यायला हवे. आता श्रद्धाच्या फोटोसमोर मेणबत्त्या का लावल्या जात नाहीत ? ‘लव्ह जिहादी’ आफताब याला शिक्षा होईपर्यंत आंदोलने का केली जात नाहीत ? ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात आहे आणि तो हिंदु मुलींच्या जिवावर उठला आहे, हे मान्य करणे अन् तो रोखण्यासाठी सर्व स्तरांवर कृती करणे, ही आताची प्राथमिकता आहे.

शासनाने आश्वस्त करावे !

पुरोगामी कंपूने या प्रकरणी तोंडाला कुलूप लावले असले, तरी आता सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडून हिंदूंच्या पुष्कळ अपेक्षा आहेत. ‘बळजोरीने केले जाणारे धर्मांतर हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे’, असे सांगून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी उद्युक्त केले आहे. केंद्र सरकारने खरोखरच या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करावा. ख्रिस्त्यांकडून कपटाने होणारे हिंदूंचे धर्मांतर, मुसलमानांकडून हिंसेच्या बळावर होणारे धर्मांतर यांसह धर्मांतराची ‘लव्ह जिहाद’सारखी षड्यंत्रे सरकारने उघड करावीत. असे गुन्हे कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ कायदे पुरेसे नसतात, हे आतापर्यंत अनेक प्रकरणांतून उघड झाले आहे. त्यामुळेच लोकजागृती करणे, अशा प्रकरणांत दोषी आढळलेल्या गुन्हेगारांना जरब बसेल, अशा प्रकारे शिक्षा करणे, हेही प्रयत्न आता व्हायला हवेत. हिंदू धार्मिक चौकटीत अडकले नाहीत, तरी मुसलमान त्यांचा हिंदुद्वेष सोडायला सिद्ध नसल्यामुळे आता कठोर पावले उचलणे क्रमप्राप्तच झाले आहे. यासाठी शासन आणि प्रशासन यांनी जनतेला आश्वस्त करावे, हीच अपेक्षा !

श्रद्धा वालकर हत्येच्या प्रकरणी पुरोगामी आणि स्त्री-स्वातंत्र्यवाले गप्प का आहेत ?