जगाची लोकसंख्या झाली ८०० कोटी !

२४ वर्षांत लोकसंख्येत २०० कोटींनी वाढ !

नवी देहली – जगाची लोकसंख्या ८०० कोटी झाली आहे. जागतिक लोकसंख्येची माहिती देणार्‍या संकेतस्थळाने १५ नोव्हेंबर या दिवशी दुपारी दीड वाजता एका बाळाच्या जन्मानंतर जगाची लोकसंख्या ८०० कोटी झाली, असे सांगितले. विशेष म्हणजे मागील अवघ्या २४ वर्षांतच जगाची लोकसंख्या तब्बल २०० कोटींनी वाढली आहे.

१. वर्ष १९९८ मध्ये जगाची लोकसंख्या ६०० कोटी होती. ती वर्ष २०१० मध्ये वाढून ७०० कोटी झाली. पुढील १२ वर्षांत, म्हणजे वर्ष २०२२ मध्ये लोकसंख्येत आणखी १०० कोटींची भर पडली.

२. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून, म्हणजे  मागील २ सहस्र वर्षांपासूनची जगभरातील लोकसंख्येची आकडेवारी उपलब्ध आहे. त्या वेळी जगाची लोकसंख्या अवधी २० कोटी होती. त्यानंतर १०० कोटींपर्यंत पोचण्यासाठी जवळपास १ सहस्र ८०० वर्ष लागले.

३. औद्योगिक क्रांतीसमवेतच आरोग्य सेवांतही सुधारणा झाली. त्यामुळे जन्माला येणार्‍या मुलांच्या आणि बाळंतपणाच्या वेळी मृत्यू होणार्‍या महिलांच्या संख्येत घट झाली. यामुळे लोकसंख्येत वेगवान वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

एकीकडे जगाची लोकसंख्या जलद गतीने वाढत आहे, तर दुसरीकडे अन्न-पाणी यांच्या अभावी जगातील अर्धी जनता अर्धपोटी रहात आहे. जर अशाच प्रकारे लोकसंख्या वाढू लागली, तर एक दिवस संपूर्ण जगामध्ये पाणी आणि अन्न यांवरून अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच यावर उपाययोजना काढणे आवश्यक आहे !