पुणे महापालिकेच्या ‘सारथी’वर तक्रारी करूनही दुर्गंधीची समस्या सुटेना !

नागरिकांची तक्रार

पुणे – येथील शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर आणि शिवतेजनगर या भागांमध्ये २ मासांपासून दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुर्गंधीचे मूळ कुठे आहे ? याचा तपास महापालिकेच्या आरोग्य विभागाला किंवा पर्यावरण विभागाला लावता आलेला नाही. स्थानिकांनी महापालिकेच्या ‘सारथी’वर (महापालिकेचे ॲप) २ वेळा तक्रार करूनही महापालिका अधिकार्‍यांकडून अद्याप नोंद घेतली जात नाही. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी, पर्यावरण विभागाचे अधिकारी यांना याविषयी मेलद्वारे, आणि भ्रमणभाष करून कल्पना दिलेली आहे; परंतु अजूनपर्यंत महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना काढली गेलेली नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. अनेक लोकांना या दुर्गंधीमुळे उलटी, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे असे त्रास आहेत. याचा लवकर निपटारा केला गेला नाही, तर आणखी तीव्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांच्या समस्यांविषयी असंवेदनशील प्रशासन !