साधिकेच्या आजाराचे कारण समजल्यावर तिची प्रेमाने विचारपूस करून तिला आधार देणार्‍या केरळ येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सौदामिनी कैमल (वय ८० वर्षे) !

श्रीमती सौदामिनी कैमल

१. साधिकेशी भ्रमणभाषवर बोलतांना तिच्या आवाजातील पालट ऐकून श्रीमती सौदामिनी कैमल यांनी तिच्या प्रकृतीची विचारपूस करणे आणि आजाराचे कारण समजल्यावर तिला प्रेमाने धीर देणे

‘मी लिहिलेला एक लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला होता. तो लेख वाचून केरळ सेवाकेंद्रातील साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांनी मला भ्रमणभाष केला. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘तुझा आवाज सर्दी झाल्याप्रमाणे येत आहे. तू बरी आहेस ना ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्या मेंदूत जीभेला जोडलेल्या नसेशी छोटीशी गाठ झाली आहे. त्यामुळे माझा आवाज असा येत आहे.’’ माझे बोलणे ऐकून त्यांनी मला पुष्कळ प्रेमाने धीर दिला. त्या मला म्हणाल्या, ‘‘तू घाबरू नकोस. परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या पाठीशी आहेत. त्यांच्या कृपेमुळे तू बरी होशील. मलाही आता चालता येत नाही. मी खोलीतच असते, तरीही मी त्यांच्याच कृपेने आनंदात आहे.’’

श्रीमती गीता प्रभु

२. श्रीमती सौदामिनी कैमल यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधिकेचा आजार लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करीन’, असे सांगितल्यावर त्यांच्या बोलण्याने पुष्कळ आधार वाटणे

नंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘मी तुझा आजार लवकर बरा होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करीन.’’ त्यांनी इतक्या प्रेमाने आणि मनापासून सांगितल्यावर मला पुष्कळ आधार वाटला. त्यांचे ते बोलणे माझ्या अंतर्मनापर्यंत पोचले आणि मला पुष्कळ आनंद झाला. ‘निरपेक्ष प्रेम कसे असते ?’, ते मी अनुभवले. त्यांच्या बोलण्यात मला गुरुमाऊलींच्याप्रती (परात्पर गुरु डॉक्टरांच्याप्रती) दृढ श्रद्धा जाणवली.

‘श्रीमती सौदामिनी कैमल यांच्याप्रमाणे माझ्यातही गुरुमाऊलींप्रती दृढ श्रद्धा निर्माण होऊ दे’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कोमल चरणी शरणागतभावाने आर्त प्रार्थना !’

– श्रीमती गीता प्रभु (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२२)