रेडियमपट्टी आणि रिफ्लेक्टर न लावणार्‍या वाहनचालकांवर कारवाई ! – समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

समीर शेख

सातारा, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – रेडियमपट्टी आणि रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांवर सातारा पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २०५ वाहनचालकांवर कारवाई करून १ लाख ९० सहस्र ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

समीर शेख पुढे म्हणाले की, अनेक ऊस वाहतूक करणारे वाहनचालक वाहनांच्या मागील बाजूस रेडियमपट्टी किंवा रिफ्लेक्टर न लावताच वाहने चालवतात, तसेच कर्णकर्कश आवाजात गाणी लावून अपघाताला निमंत्रण देत असतात. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १२ नोव्हेंबर या दिवशी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. ध्वनीप्रदूषण करणार्‍या १८ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १२ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कर्णकर्कश आवाजात गाणी लावणार्‍या ७८ वाहनचालकांना ‘साऊंड सिस्टिम’ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. इतर कायद्यान्वये १०८ वाहनांवर कारवाई करून ७५ सहस्र ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.