भारतातील ९९ टक्के मुसलमान ‘हिंदुस्थानी ! ’ – इंद्रेश कुमार, नेते, रा.स्व. संघ

ठाणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मताचे समर्थन केले आहे. ‘सर्व  भारतियांचे पूर्वज एकच होते, त्यामुळे त्यांचा डी.एन्.ए. एकच आहे’, असे मत प.पू. सरसंघचालकांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानाची पुष्टी करतांना इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे की, भारतातील ९९ टक्के मुसलमान हे त्यांचे पूर्वज, संस्कृती, परंपरा आणि मातृभूमी यांदृष्टीने ‘हिंदुस्थानी’ आहेत. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लीम शाखा असलेल्या ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. आपल्याला पवित्र कुराणच्या सूचना आणि तत्त्वे यांनुसार आपल्या राष्ट्राप्रती असलेले आपले कर्तव्य सर्वोच्च अन् इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे मानले पाहिजे, असे इंद्रेश कुमार म्हणाले.

‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या कार्यशाळेत राज्यभरातील ४० हून अधिक ठिकाणांहून एकूण २५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता.  या वेळी ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’चे राष्ट्रीय निमंत्रक इरफान अली पिरजादे यांच्यासह  संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.