डेगू (दक्षिण कोरिया) येथे बांधण्यात येणार्‍या मशिदीला स्थानिक कोरियन नागरिकांचा विरोध !

डेगू (दक्षिण कोरिया) – येथील दाहेयोंग-डोंग भागात रहाणारे स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित मुसलमान यांच्यात येथील मशिदीवरून वाद झाला. या मशिदीचे बांधकाम वर्ष २०२० पासून चालू आहे. तिचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. येथील ‘क्यूंगपुक नॅशनल युनिव्हर्सिटी’चे मुसलमान विद्यार्थी वर्ष २०१४ पासून येथील एका घराचा नमाजपठणासाठी वापर करत होते. आता याच भागात मशीद बांधण्यात येत आहे. या मशिदीमुळे स्थानिक कोरियन नागरिक घाबरलेले असून ते त्यांची घरे विकून दुसरीकडे जाण्याच्या सिद्धतेत आहेत.

१. वर्ष २०२० च्या आकडेवारीनुसार दक्षिण कोरियात स्थलांतरित लोकांची लोकसंख्या आता ३.३ इतकी झाली असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

२. वर्ष २०२० मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश येथील ६ स्थलांतरित मुसलमानांच्या गटाने येथे भूमी विकत घेतल्यानंतर येथील स्थिती पालटू लागली. येथे २० मीटर लांब मशीद बांधणे चालू करण्यात आले आहे. आता येथे एकाच वेळी १५० हून अधिक मुसलमान नमाजपठणासाठी येतात.

३. स्थानिक कोरियन नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून आम्ही येथे मुसलमानांसमवेत रहात आहोत. तेव्हा आम्हाला काहीच समस्या नव्हती; मात्र आता येथे मशीद बांधण्यात आल्याने नमाजाचा आवाज वाढला आहे. आता मशिदीमुळे येथे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आमचा त्यांच्या धर्माला विरोध नाही.

४. मशिदीचे बांधकाम चालू झाल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला तक्रारी करणे चालू केले होते. त्यानंतर प्रशासनाने मशिदीचे काम थांबवले होते. यानंतर मुसलमानांनी याविरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यावर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्याला आव्हान देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही मशीद बांधण्याची अनुमती दिली.

५. स्थलांतरितांच्या विरोधातील आंदोलनाचे नेते ली ह्युंग-ओह यांनी सांगितले की, हिजाबचे नियम हेच त्यांच्यासाठी पुरेसे आहेत की, त्यांनी आमच्या देशात कधीही पाय ठेवू नये. आम्ही बहिष्कारवादी दिसत असलो, तरी त्यामागे हेच लोक आहेत.

डुकराचे मांस शिजवून केला जात आहे विरोध !

न्यायालयाच्या अनुमतीनंतरही स्थानिक नागरिक मशिदीला विरोध करत आहेत. ते मशिदीचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करत आहेत. आता त्यांनी मशिदीच्या प्रवेशद्वाराबाहेर गाड्या उभ्या करणे चालू केले आहे, तसेच येथे डुकराचे डोके कापून ठेवू लागले आहेत. यासह या भागात उघड्यावर डुकराचे मांस शिजवू लागले आहेत. नमाजपठणाच्या वेळी मोठ्या आवाजात भोंग्यांवरून गाणी लावली जात आहेत. ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावून मशिदीला विरोध केला जात आहे. या भित्तीपत्रकांवर ‘आम्ही इस्लामी मशिदीच्या बांधकामाला विरोध करत आहेत’, तसेच ‘आतंकवाद्यांचा अड्डा’, असे लिहिण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामचा अर्थ ‘शांतता’ असा असतांना कुठल्याही देशात धर्मांध मुसलमानांमुळे शांततेऐवजी अशांतताच का निर्माण होते ?, याचा अभ्यास कुणी कधी करणार आहे का ?