पी.एफ्.आय.शी संबंधित असलेल्या संशयिताने कोंढवा (पुणे) येथे ४ अवैध इमारती बांधून त्यांची केली विक्री !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) सप्टेंबरमध्ये आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये ‘पी.एफ्.आय.’च्या अनेक ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या, तसेच पुण्यातही अटकेची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकानेही (ए.टी.एस्.) समांतर अन्वेषण केले होते. या अन्वेषणात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या संघटनेच्या अटक केलेल्या एका संशयिताने कोंढवा परिसरात ४ अवैध इमारती बांधून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या इमारती अवैधरित्या बांधण्यात आल्याने त्यांची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने या इमारतीत रहाणार्‍यांना नोटिसा बजावण्यास आरंभ केला आहे.

केंद्रीय यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या दाव्यानुसार देशामध्ये काही वर्षांपासून चालू असलेल्या घातपाती, तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलीस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘पी.एफ्.आय.’शी आला आहे. या संघटनेच्या वतीने परदेशातून विशेषतः आखाती देशांतून येणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे. पैशांचा स्रोत आणि त्याचा झालेला वापर यांविषयी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सखोल चौकशी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोंढव्यात उभ्या राहिलेल्या इमारतींविषयीही पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.