नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सिद्धता चालू !

वर्ष २०१९ मध्ये ६८ कोटी रुपये व्यय

विधीमंडळ

नागपूर – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून येथे चालू होणार आहे. त्यासाठीची सिद्धता चालू झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सिद्धतेवर एकूण ६८ कोटी रुपये व्यय झाले होते.

१. २ दिवसांत विधीमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला प्रारंभ होईल. रविनगर परिसरातील बंगल्यांच्या रंगरंगोटीची कामे चालू झाली आहेत. अधिवेशनाची कामकाज पत्रिका सिद्ध झाली असून २ आठवड्यांचे कामकाज आहे. सुट्या धरून एकूण ९ दिवसांचे काम प्रतिवर्षी होते.

२. नागपूर येथे २ वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग २ अधिवेशने होऊ शकली नाहीत. आघाडीच्या दुसर्‍या वर्षाच्या काळात कोरोनाची साथ ओसरली होती, तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

३. मुंबई येथे झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘पुढील अधिवेशन नागपूर येथे होईल’, अशी घोषणाही विधानसभा अध्यक्षांनी केली होती.

विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी केली पहाणी !

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभीच ‘हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपूर येथे होईल’, असे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नागपूर येथे येऊन गेले. त्यांनी पहाणी केली आणि बैठक घेऊन अधिकार्‍यांना सिद्धतेला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कामांना प्रारंभ केला आहे.