‘वन्दे मातरम्’विषयी प्रेम न बाळगणार्या काँग्रेसची पदयात्रा ‘भारत जोडो’साठी कि मतांसाठी ?
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ पदयात्रा चालू आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकूण १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतून ही पदयात्रा जाणार आहे. स्वातंत्र्याच्या काळात म. गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती ते दांडी अशी पदयात्रा काढली होती; परंतु आज जे ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढत आहेत, त्यांनीच म्हणजे काँग्रेसने भारताला तोडण्याचे काम केले आहे. साम्यवादाच्या नावाखाली ‘नक्षलवाद’, तर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाच्या नावाखाली ‘धर्मांधता’ यांना काँग्रेसच्या काळातच बळ मिळाले. जे स्वत:ला बुद्धीवादी, विचारवंत, पुरोगामी मंडळी समजतात, त्यांना भारतीय संस्कृती प्रतिगामी वाटते. संधी मिळेल तेव्हा भारतीय संस्कृतीला दूषणे देणारी आणि बुरसटलेली म्हणणारी ही मंडळी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आज देशविरोधी गरळओळ करत आहेत. फाळणीच्या वेळी देशात राहिलेल्या मुसलमानांचा पुळका येऊन काँग्रेसने त्यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा दिला; मात्र त्यांना राष्ट्रनिष्ठेचे धडे दिले नाहीत. हे पाप काँग्रेसचेच आहे. पाकिस्तानने भारतात अनेक ठिकाणी स्थानिकांच्या साहाय्याने बाँबस्फोट केले, हा काँग्रेसच्या अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचाच परिणाम आहे. अशी काँग्रेस ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढते, तेव्हा ‘भारत तोडला कुणी ?’, हा प्रश्न भारतियांनीच त्यांना विचारायला हवा.
राहुल गांधी ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढतात; परंतु देशाला ‘राष्ट्र’ म्हणून जोडण्यासाठी त्यांनी एकदा तरी ‘वन्दे मातरम्’चा पुरस्कार केला आहे का ? ‘आम्ही केवळ अल्लाच्या पुढे झुकणार’, असा उद्दामपणा दाखवणार्या धर्मांधांना राहुल गांधी यांनी ‘वन्दे मातरम् हे मातृभूमीप्रती सन्मान व्यक्त करणारे आहे’, हे का सांगितले नाही ? महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये दूरभाषवर बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश काढला, तेव्हा त्यावर टीका करणार्यांमध्ये राहुल गांधी यांच्या समवेत पदयात्रेत चालणारे काँग्रेसचे नेतेच अग्रभागी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने काळानुरूप प्रचारतंत्र पालटले, तरी तिची ‘हिंदुद्रोही वृत्ती’ ही कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे वाकडीच आहे.
वारसा न सांगणारे काँग्रेसवाले !
काँग्रेसची मंडळी गांधी-नेहरू घराणेशाहीचा वारसा सांगतात; परंतु प्रखर राष्ट्रनिष्ठ असलेले लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगत नाहीत ! ज्यांना स्वत:च्या पक्षातील प्रखर राष्ट्रवादी नेत्यांचा वारसा सांगता येत नाही, ते कर्मदरिद्री नेते कधीतरी भारत जोडू शकतील का ? राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी आदी विषयांवर या पदयात्रेत भाष्य केले; परंतु राष्ट्रनिष्ठेविषयी ते कधी का बोलत नाहीत ? राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ची घोषणा केली; मात्र भारताला एकसंध ठेवू शकेल, अशी राष्ट्रनिष्ठा; देशातील संस्कृतीचे महत्त्व आणि मातृभूमीविषयी प्रेम कधी दाखवले आहे का ? एकीकडे ‘नफरत (द्वेष) छोडो, भारत जोडो’, अशी घोषणा द्यायची आणि हिंदूंना दुहीची वागणूक द्यायची, तर दुसरीकडे ‘संविधान बचाएंगे, मिलकर भारत जोडेंगे’, अशी घोषणा द्यायची; मात्र ‘शरियत’ लागू करण्याची भाषा करणार्यांविषयी गप्प रहायचे, याला काय अर्थ आहे ?
भारत जोडो कि काँग्रेस बचाओ ?
काँग्रेसचे नेतृत्व न पेलल्यामुळे राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. त्यामुळे सोनिया गांधी यांना पक्षाची धुरा सांभाळावी लागली. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर मागील २ वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्ष ‘अध्यक्षाविना’ होता. पक्षाची दुरवस्था झाली असतांनाही घराणेशाहीतून बाहेर पडायला काँग्रेस सिद्ध नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून अप्रसन्नता व्यक्त केली. त्यानंतर मागील मासात निवडणूक होऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना सहकारी पक्ष विचारातही घेत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती काँग्रेसची झाली आहे. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात बळकट होत आहे. काँग्रेसपेक्षा अधिक उमेदवार निवडून लोकसभेत विरोधी पक्षाचे स्थान मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे किमान वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात दुसर्या क्रमांकाचे उमेदवार निवडून आले नाहीत, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पदही काँग्रेसला गमवावे लागेल, अशी दयनीय स्थिती काँग्रेसची झाली आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’ कसले, किमान स्वत:ची लाज राखली जाईल, एवढे सदस्य तरी निवडून यावेत, यासाठी ‘पदयात्रा’ काढणे राहुल गांधी यांना अपरिहार्यच होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही पक्षाला बळकट करण्यासाठी पदयात्रा काढल्या. सध्याची काँग्रेसची स्थिती पाहिली, तर ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी लोकसभेत ४०० हून अधिक जागा असलेल्या या पक्षाला वर्ष २०१९ मध्ये कशाबशा ५३ जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या या स्थितीला अन्य कुणी नव्हे, तर ती स्वतःच उत्तरदायी आहे. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यास काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. प्रभु श्रीरामाविषयीही काँग्रेसला मुळीच श्रद्धा नव्हती. राष्ट्रहित आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचा विचार न करणारी काँग्रेस भारताला कसे जोडणार ?