सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा करी (वय ६५ वर्षे) !

कार्तिक कृष्ण चतुर्थी (१२.११.२०२२) या दिवशी श्रीमती मीरा करी यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील साधिका कु. गायत्री जोशी हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती मीरा करी

श्रीमती मीरा करी यांना ६५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. कार्यपद्धतीचे महत्त्व समजावून सांगणे

कु. गायत्री जोशी

‘मी रामनाथी आश्रमात नवीनच आले होते. तेव्हा मला कार्यपद्धतींचे पालन करता येत नव्हते. त्या वेळी श्रीमती करीकाकू यांनी मला प्रत्येक कार्यपद्धत नीट समजावून सांगून ‘साधनेत आदर्श कृती कशी करायची ?’, हे शिकवले, उदा. नियमित कपडे धुऊन ते वाळत घालणे, कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालणे, स्वतःचा खण व्यवस्थित लावणे.

२. तत्त्वनिष्ठ राहून साधिकेला साहाय्य करणे

काकूंनी मला साधनेत साहाय्य केल्यामुळे मला केवळ त्यांच्याविषयी अधिक जवळीक वाटत होती. तेव्हा त्यांनी मला माझी स्थिती परखडपणाने सांगून ‘सर्वांचे खरे नाते देवाशीच असते’, हे समजावून सांगितले.

३. सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारणे

काकू सतत सकारात्मक असतात आणि मलाही तसा दृष्टीकोन देऊन साधनेत पुष्कळ प्रोत्साहन देतात. काकूंना आजपर्यंत मी कधीही निराश किंवा उदास झालेले पाहिले नाही. ‘ईश्वरेच्छा’ समजून आहे त्या परिस्थितीत काकू नेहमी समाधानी रहातात.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

काकू स्वतःचे त्या त्या दिवशीचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित पूर्ण करून नंतरच झोपतात. त्या स्वतःकडून झालेल्या चुका प्रामाणिकपणे फलकावर लिहितात.

५. सेवेची तळमळ

अ. काकू ‘कन्नड’ टंकलेखन आणि भाषांतर करणे, या सेवा अतिशय भावपूर्ण रीतीने करतात. त्या सेवेत झालेल्या चुका लिहून ठेवतात आणि ‘चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न करतात.

आ. काकूंना ‘सायटिका’चा त्रास आहे (सायटिका : कंबरेपासून पायाच्या मागील भागापर्यंत पसरणार्‍या वेदना); पण या त्रासामुळे त्यांनी सेवेत कधीच सवलत घेतली नाही. त्या नेहमी औषधे घेतात आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून त्रासावर मात करतात.

६. कृतज्ञताभाव

सौ. विद्या शानभाग या काकूंच्या कन्या असून श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हे त्यांचे जावई आहेत. ‘देवाने मला विनायकसारखे जावई दिले’, असे काकू नेहमी कृतज्ञताभावाने सांगतात. (श्री. विनायक शानभाग हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्‍याच्या सेवेसाठी जातात.)

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना काकूंना लगेच भावाश्रू येतात. ‘श्री गुरूंना अपेक्षित असे आचरण व्हावे’, याचा त्यांना सतत ध्यास लागलेला असतो.

‘हे गुरुदेवा, ‘मला श्रीमती मीरा करीकाकू यांचा सत्संग मिळत आहे’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. गायत्री जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)