१. संपूर्ण जगाला भेडसावणारी एक मोठी समस्या वायूप्रदूषण असणे
‘देहली येथील वायूप्रदूषणामुळे एका नवीन चर्चेला आरंभ झाला आहे; परंतु प्रदूषण केवळ राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातच (NCR) आहे, असे नाही; उलट संपूर्ण जगाला ती एक मोठी समस्या भेडसावत आहे आणि जगभरातील सर्व प्राणीमात्रांंवर त्याचा दुष्परिणाम जाणवत आहे. मग ते कोणत्याही महानगरात रहात असो किंवा अतीदूरवर उत्तर किंवा दक्षिण ध्रुवप्रदेशात रहात असो.
२. वायूप्रदूषणामुळे होणारी हानी
अ. वायूप्रदूषणामुळे मानवाचे दृष्टीक्षेत्र अत्यंत सीमित झाले. प्रदूषणजन्य धुक्यामुळे कित्येक वाहन अपघातही झाले आहेत.
आ. वायूप्रदूषण येथपर्यंत झाले की, विद्यालयांमध्येही ते घोषित करावे लागले.
इ. मनुष्य जीवनासाठी प्रथम अनिवार्य असलेला श्वास घेण्याएवढीसुद्धा त्याला शुद्ध हवा मिळत नाही.
वायूप्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी मानसिक आणि बौद्धिक स्तरावर शासन-प्रशासनाने आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न केले; परंतु केवळ एवढेच प्रयत्न करणे पुरेसे आहेत का ?
३. वायूप्रदूषण होण्याची कारणे
३ अ. विविध विशेष तज्ञांनुसार वाहन (वाहनातून बाहेर पडणारा धूर), यंत्रे (कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर), शेतात पेंढा जाळल्यामुळे उत्पन्न होणारा धूर यांमुळे प्रदूषण होते.
३ आ. वातावरणातील दूषित हवा वृक्षांमुळे न्यून होते; परंतु वृृक्षांच्या घटत्या संख्येमुळेसुद्धा या समस्येत आणखी भर पडली आहे; परंतु हा विचार करणे आवश्यक आहे की, केवळ याच कारणांमुळे प्रदूषण होते आहे का ? या प्रदूषणाची मूळ कारणे आणि मूळ समस्या यांवर विचार करायला पाहिजे ना ?
४. श्वासाविना मनुष्य जीवनाची कल्पनाच व्यर्थ आहे आणि शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे, जो त्याला भौतिकतेच्या मागे धावणार्या आजच्या जगात मिळत नाही, यासाठी दोषीही मनुष्य आणि त्याची लोभी प्रवृत्तीच आहे.
५. भारतीय संस्कृती मानवाला निसर्गाचा योग्य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर करावा, याची शिकवण देणारी असणे
५ अ. निसर्गाचा योग्य रितीने आणि कृतज्ञताभावाने वापर कशा प्रकारे केला जावा ? हे आपल्या वेद अन् पर्यावरण सापेक्ष संस्कृती यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला समजावणारे आहे. असे असतांना राष्ट्राची अर्थात् भारताची राजधानी देहलीमधील वायू प्रदूषणाचे जे सांप्रत संकट आहे, ते एक विसंगती नाही, तर आणखी दुसरे काय आहे ? ही विसंगती आपल्या राष्ट्रीय मूळ चरित्रापासून भ्रष्ट झाल्यामुळेच उत्पन्न झाली आहे.
५ आ. ज्या राष्ट्रात पर्यावरणाच्या शुद्धीसाठी नियमित गायीच्या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्येसाठी पशूवधगृहे उघडण्याची अनुमती स्वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्चर्याची गोष्ट नाही !
५ इ. ज्या संस्कृतीमध्ये वृक्षपूजन करण्याची परंपरा होती, आज तेथेच विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड निरंतर चालू आहे आणि वृक्षारोपणाच्या नावाखाली ‘रोपांच्या लागवडीचे’ नाटक अनेक वर्षांपासून केले जात असेल, तेथे प्रदूषणापासून मुक्ती कशी मिळेल ?