(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या अस्थिविसर्जनानंतर वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे आणि भगवंताची अनुभवलेली कृपा !

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांच्या निधनानंतरचा आज (१०.११.२०२२) बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

पू. पद्माकर होनप

१. अस्थिविसर्जन विधीनंतर दुचाकीवरून आश्रमात आल्यावर गाडी लावतांना साधिका पडणे

‘२.११.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांचे अस्थिविसर्जन झाले. विधी झाल्यावर मी दुचाकीने रामनाथी आश्रमात आले आणि दुचाकी लावत असतांना माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊन मी पडले अन् दुचाकी माझ्या अंगावर पडली. त्या वेळी मला काहीच समजले नाही. रस्त्यावरील एका व्यक्तीने येऊन माझ्या अंगावर पडलेली दुचाकी उचलली आणि हात धरून मला उभे केले. त्या व्यक्तीने मला जवळच्या कठड्यावर बसायला सांगितले आणि पाणी दिले. त्यानंतर मला थोडे बरे वाटले. त्या वेळी माझ्या डाव्या गुडघ्याला मुका मार लागला होता.

२. खोलीतील दिव्याचा भडका होऊन तेथील भिंत काळी होणे

अस्थिविसर्जनानंतर खोलीत आल्यावर पाहिले, तर त्यांच्यासाठी खोलीत लावलेला दिवा शांत झाला होता. तो दिवा ज्या भिंतीजवळ ठेवला होता, ती भिंत दिव्याच्या काजळीने जवळजवळ ७ फूट उंचीपर्यंत काळी झाली होती. दिव्याखाली ठेवलेला द्रोण जळून त्याची राख झाली होती. खरेतर दिव्याखालील द्रोण जळण्याचे काहीच कारण नव्हते.

वरील दोन्ही प्रसंग सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ही दोन्ही वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे होती. संतांच्या चैतन्याचा लाभ होऊ नये; म्हणून वाईट शक्तींनी ही आक्रमणे केली.’’

३. भगवंताची अनुभवलेली कृपा !

पहिल्या प्रसंगात मला गाडीवरून पाडण्याच्या माध्यमातून वाईट शक्तींनी माझ्यावर आक्रमण केले; परंतु त्याच वेळी रस्त्यावरील व्यक्तीच्या माध्यमातून भगवंताने मला साहाय्यही केले, तसेच मोठी दुखापत न होता मला केवळ खरचटले, हीसुद्धा भगवंताची कृपा !

दुसर्‍या प्रसंगात दिव्याचा भडका उडण्याच्या माध्यमातून वाईट शक्तींनी आक्रमण केले. तेथे जवळच खिडकीचा पडदा होता, तसेच पलंगावर अंथरुणेही होती; पण ती जळाली नाहीत. भगवंताने मोठी आग लागण्यापासून वाचवले. कृतज्ञता भगवंता !’

– सुश्री (कु.) दीपाली होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक