त्रिपुरारि पौर्णिमेला सहस्रावधी भाविकांनी महाआरती करून घेतले बाणगंगेचे दर्शन !

बाणगंगेच्या आरतीसाठी मोठ्या प्रमाणात आलेले भाविक

मुंबई, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – ७ नोव्हेंबर म्हणजे त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी सहस्रावधी भाविकांनी महाआरती करून बाणगंगेचे दर्शन घेतले. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टच्या वतीने हा महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उज्जैनपिठाचे सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची वंदनीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

१. शेकडो भाविकांनी बाणगंगेमध्ये दीप अर्पण केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग अधिक होता. ढोल, झांज आदी पारंपरिक वाद्यांचा गजर करत कार्यक्रमस्थळी भगवे ध्वज फडकवण्यात आले. वेदमंत्रपठणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर शंखनाद करण्यात आला.

२. प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांचा वेश परिधान करून उपस्थित असणारी मुले सर्वांचे आकर्षण ठरले. या वेळी पारंपरिक वेश परिधान करून युवतींनी बाणगंगेपुढे नृत्य सादर केले. संतांच्या मार्गदर्शनानंतर आरतीला प्रारंभ झाला.

३. गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट्रचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, उपाध्यक्ष अवधून दाभोलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर, अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रमुख डॉ. विजय जंगम (स्वामी) या सर्वांच्या व्यवस्थापनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

४. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक हेही व्यासपिठावर उपस्थित होते. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून बाणगंगेचे दर्शन घेतले.

बाणगंगाक्षेत्र उज्जैनप्रमाणे पवित्र ! – श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी, सद्धर्मसिंहासनाधिश्वर, उज्जैनपीठ

भारत ही पुण्य आणि धर्म भूमी आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘पाश्चात्त्य लोक देवापेक्षा देहावर प्रेम करतात; परंतु या जगात एका देशातील लोक देहापेक्षा देवावर प्रेम करतात, तो देश भारत आहे’, असे भारतदेशाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. प्रभु श्रीराम वनवासात असतांना लक्ष्मणाने बाण मारून ही बाणगंगा निर्माण केली. प्रभु श्रीरामांची तहान भागवणार्‍या बाणगंगेचे क्षेत्र हे अत्यंत पवित्र आहे. प्रभु श्रीरामांनी स्वत:च्या हाताने स्थापन केलेले शिवलिंग येथे आहे. त्यामुळे हे क्षेत्र उज्जैनप्रमाणे अत्यंत पवित्र आहे. बाणगंगाक्षेत्राच्या विकासाचा आराखडा आपण सिद्ध करावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी मी कधीही सिद्ध आहे.

श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ भेट !

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. बळवंत पाठक यांनी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांना समितीने प्रकाशित केलेला ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देऊन, तसेच पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या वेळी महास्वामीजींनी स्वत:च्या गळ्यातील पुष्पहार काढून श्री. सुनील घनवट यांना घालून ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे’, असे आशीर्वचन दिले.