सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील दिव्यनगरीमध्ये ‘श्री विठ्ठल प्रसाद भजनी मंडळा’च्या वतीने सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. गुरुवर्य सुरेश महाराज पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली १० ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत कोंढवे येथील दिव्यनगरी येथे हा सोहळा होणार आहे. सोहळ्यामध्ये प्रतिदिन पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत काकड आरती, सकाळी ९ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रवचन, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन आणि ९ नंतर जागरण असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सोहळ्यामध्ये ह.भ.प. सतिश महाराज निंबाळकर, ह.भ.प. स्नेहाजी, सद्गुरु भांडवलकर बाबा हे प्रवचन सेवा देणार आहेत, तसेच ह.भ.प. अशोक महाराज संकपाळ, ह.भ.प. सागर महाराज पवार, ह.भ.प. विजय महाराज शेलार हे कीर्तन सेवा करणार आहेत. १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत ह.भ.प. सुरेश महाराज पार्टे यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता होईल. तरी समस्त भाविकांनी या सोहळ्यात तन, मन, धनाने सहभागी होऊन सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.