५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. संस्कृती मंगेश खांदेल (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. संस्कृती मंगेश खांदेल या पिढीतील आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

चि. संस्कृती मंगेश खांदेल हिचा श्री गणेशचतुर्थीच्या (३१.८.२०२२) दिवशी दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. संस्कृती खांदेल

१. सौ. मुक्ता मंगेश खांदेल (आई), यवतमाळ

१ अ. गरोदरपण : ‘गरोदरपणाच्या कालावधीत माझ्याकडून ‘भावजागृतीचे प्रयत्न, अनुसंधानात रहाणे, नामजप, प.पू. गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) सतत बोलणे, ग्रंथांचे वाचन’ अशा स्वरूपांचे व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न होत होते आणि ‘गर्भ त्याला प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवत होते.

१ आ. जन्म ते १ वर्ष

१ आ १. देवाची ओढ : बालिकेला झोपवतांना मी भावजागृतीची ध्वनीचकती लावत असे. तेव्हा ‘बालिका एकाग्रतेने ऐकत आहे’, असे मला वाटायचे; कारण ती बंद झाल्यावर बाळ डोळे उघडून पहात असे. मी प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) भजने आणि नामजप सतत लावून ठेवत होते. भजने चालू असायची, तोपर्यंत बालिका शांत झोपत असे आणि भजने बंद झाल्यावर झोपेतून उठत असे. तिचे नाव ‘संस्कृती’, असे ठेवले आहे.

१ इ. वय १ ते २ वर्षे

१ इ १. हसरी : संस्कृती सदैव हसत आणि खेळत रहाते. तिच्याकडे पाहून सर्व थकवा निघून जातो.

१ इ २. व्यवस्थितपणाची आवड : एकदा माझ्याकडून एक आसन अव्यवस्थित घातले गेले. तेव्हा ती लगेच तिथे आली आणि तिने ते सरळ केले. तिला अव्यवस्थित काही दिसल्यास ती ते लगेच नीट करण्याचा प्रयत्न करते. पायपोस असो किंवा तिची गोधडी उलटी पडली किंवा त्यावर सुरकुती पडलेली दिसली, तर संस्कृती आधी ती नीट करते.

१ इ ३. सेवेची आवड : मी घरातील केर काढते, तेव्हा ती तिची केरसुणी आणते आणि माझ्या समवेत केर काढण्याचा प्रयत्न करते. ‘तिला शिकण्याची आणि सेवा करण्याची आवड आहे’, असे मला जाणवते.

१ इ ४. सात्त्विकतेची ओढ : या वर्षी गुरुपौर्णिमेच्या सकाळच्या सत्रामध्ये झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य मंगलमय रथोत्सव आणि नंतर गुरुपूजन ती एकाग्रतेने पहात होती. तिने पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही.

१ ई. स्वभावदोष : हट्टीपणा आणि खोडकरपणा’

२. श्री. मंगेश खांदेल (बाबा), यवतमाळ

२ अ. आवड-नावड नसणे : ‘चि. संस्कृतीला जेवणाच्या पदार्थांमध्ये कुठलीही आवड-नावड नाही. आम्ही आमच्यासाठी जो स्वयंपाक करतो, तो ती आवडीने खाते.

२ आ. प्रेमभाव : तिच्या बोलण्यामध्ये गोडवा आणि प्रेमभाव जाणवतो. ती सर्वांशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलते.

२ इ. सात्त्विकतेची ओढ : अत्तर-कापूर दिसताच ती स्वतः उपाय करते आणि इतरांनाही कापूर अन् अत्तर लावून देते.

२ ई. देवाची ओढ

१. घरात सामूहिक नामजपाच्या वेळी तीही आसन घेऊन नामजपाला बसते. ‘संस्कृती, नामजप करूया’, असे तिला म्हटल्यावर ती लगेच जपमाळ घेऊन येते आणि ‘ॐ, ॐ’, असे म्हणते. कधी ती मनानेच जपमाळ घेते आणि पायर्‍यांवरती डोळे बंद करून बसते अन् ‘ॐ, ॐ’, असा नामजप करते.

२. मी देवाची आरती करत असतांना ती पूर्ण वेळ माझ्या समवेतच असते. ती भ्रमणभाषमधील ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधील गुरुदेवांची आरती लावण्यास सांगते. आरती पूर्ण झाल्यावर तिला साष्टांग दंडवत घालण्यास सांगितल्यावर ती लगेच साष्टांग दंडवत घालते. नंतर ती आम्हा सर्वांना नमस्कार करते. ‘घरात उदबत्ती फिरवणे किंवा तुळशीची पूजा करणे’, हे तिला पुष्कळ आवडते.’

३. सौ. मधुरा सराफ, साधक, यवतमाळ : ‘एकदा संस्कृती माझ्याकडे आली होती. तेव्हा ती एकटक माझ्या बैठककक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे, प.पू. बाबा आणि गुरुदेव यांच्या छायाचित्रांकडे बघत होती. तेव्हा ‘ती त्यांच्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक