पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९० वर्षे) आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

रामनाथी (गोवा) – ६.११.२०२२ (कार्तिक शुक्ल त्रयोदशी) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९० वर्षे) आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी दोन्ही संतांचे कुटुंबीय आणि साधक उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त पू. (श्रीमती) दीक्षितआजी आणि पू. (श्रीमती) डगवार या संतद्वयींनी एकमेकींची भावभेट घेतली. त्यानंतर एकमेकींना भेटवस्तू देऊन सन्मान केला आणि शुभेच्छा दिल्या. तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी साधकांनी रचलेले संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे काव्यमय कृतज्ञतापत्र या संतद्वयींना भेट देण्यात आले. या वेळी पू. (श्रीमती) दीक्षितआजी यांचा भाव जागृत झाला. ‘संतांच्या भावभेटीतील वातावरण कसे असते ?’ हे साधकांना अनुभवायला मिळाले आणि काही सूत्रे शिकायला मिळाली. या वेळी तेथील वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवले.

पू. (श्रीमती) दीक्षितआजींनी व्यक्त केलेले मनोगत

पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी

यापुढे आपल्याला अत्यंत चिकाटीने आणि अधिकाधिक साधना करायची आहे !

वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. समाधानाचा दिवस. गोडधोड करून मित्र-मैत्रिणींना वाटायचे, असा हा दिवस; पण या आनंदासमवेतच थोडेसे अंतर्मुख होऊन विचार करण्याचाही हा दिवस आहे, असे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या ९ व्या अध्यायात लिहिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘वाढदिवस करत असतांना आपण आपल्या आयुष्यातली इतकी वर्षे मागे टाकली आहेत. पुढे किती वर्षे आहेत, हे कुणाला ठाऊक आहे का ?’ म्हणूनच आपण आपल्या मनाला जाणीव करून द्यायला हवी की, यापुढे आपल्याला अत्यंत चिकाटीने आणि अधिकाधिक साधना करायची आहे. त्यामुळे आपले मानसिक समाधान हरवू न देता पुढील आयुष्यात गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून आनंदाने; पण सावधानतेने जाऊ शकू.

आज आश्रमात वाढदिवस साजरा होत आहे, हे पाहून कृतज्ञता व्यक्त झाली की, माझे भाग्य केवढे थोर म्हणूनच आश्रमातील एवढ्या बंधू-भगिनींच्या (साधकांच्या) सदिच्छा आणि संतांचे आशीर्वाद मिळाले. प.पू. डॉक्टरांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद मिळाला. ‘असेच माझे जीवन सदा आनंदी राहो आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होवो’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !