मुलांजवळ बसून मोठ्याने वाचन केल्यास त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो ! – संशोधन

महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने चक्रव्यूहाविषयी सुभद्रेला दिलेली माहिती त्या वेळी तिच्या गर्भात असणार्‍या अभिमन्यूने ऐकली होती आणि त्याला त्याचे जन्मल्यानंतरही ज्ञान होते. हेच काहीसे या संशोधनातून लक्षात येत आहे !

बार्सिलोना (स्पेन) – लहान मुले बालपणी जितके अधिक शब्द ऐकतात, तितका त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो. माता-पिता त्यांच्या मुलांजवळ बसून मोठ्याने वाचन करत असतील, तर ते ६ मासांच्या शालेय ज्ञानाइतके असते, असे येथील ‘बॉफेल फाऊंडेशन’च्या नव्या संशोधनात आढळले आहे. ‘अशी मुले इतरांच्या तुलनेत लवकर वाचायला शिकतात’, हेही संशोधनात आढळून आले.

१. मुलांच्या पालनपोषणावर झालेल्या अन्य एका संशोधनानुसार श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मुलाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलापेक्षा अनुमाने ३ कोटी अधिक शब्द ऐकलेले असतात. तथापि कौटुंबिक वातावरण, परिस्थिती आणि समाजाच्या दृष्टीने यात पालट होतो. यामुळे तो ९ वर्षांचा होईपर्यंत त्याच्या शैक्षणिक कामगिरीवर याचा सकारात्मक परिणाम होतो.

२. सर्वसाधारण धारणेच्या उलट जर माता-पिता त्यांच्या मुलांचे गृहपाठ स्वत: करून घेत असतील, तर ते योग्य नसल्याचेही या संशोधनातून आढळले. यामुळे त्याची शिकण्याची क्षमता न्यून होते. मुलांनाच त्यांचा गृहपाठ करू द्या. त्यातही त्यांची अभ्यास करण्याची विशिष्ट जागा आणि ठराविक वेळ असेल, तर यामुळे मुलांमध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते. त्यांच्यात शिस्तही निर्माण होते.

३. ‘इक्विटी लिट्रसी इन्स्टिट्यूट’चे संस्थापक पॉल गोर्सकी म्हणाले की, मुलांच्या विकासाचा वेग मंद असेल, तर त्याचे पालक त्याचा सांभाळ चुकीच्या पद्धतीने करत आहेत, असे समजावे. माता-पित्याचे वर्तन आणि त्यांच्या सामाजिक अन् आर्थिक स्थितीचा थेट परिणाम मुलाच्या शैक्षणिक कामगिरीवर होतो.

पालकांनी मुलांसाठी हे करावे !

अ. मुलांना त्यांचे छंद पूर्ण करण्याची संधी आणि वेळ द्या.

आ. मुलांच्या वाचनाची आणि खेळण्याची वेळ ठरवा. त्यामुळे त्यांना शिस्त लागेल.

इ. मुलांची तुलना कोणत्याही परिस्थितीत अन्य मुलांशी करू नका.

ई. मुलाने चांगली कामगिरी केल्यास त्यांना पारितोषिक द्या.